पावसाचे थैमान, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत; मुंबईला ऑरेंज, पालघरला रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 05:47 AM2022-07-14T05:47:17+5:302022-07-14T05:48:19+5:30

गेल्या २४ तासांपासून कोसळणाऱ्या तुफानी पावसाने  मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर परिसराला झोडपून काढले.

Rainstorms disrupting public life in many places Orange alert to Mumbai Red Alert to Palghar | पावसाचे थैमान, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत; मुंबईला ऑरेंज, पालघरला रेड अलर्ट

पावसाचे थैमान, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत; मुंबईला ऑरेंज, पालघरला रेड अलर्ट

googlenewsNext

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर : गेल्या २४ तासांपासून कोसळणाऱ्या तुफानी पावसाने  मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर परिसराला झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. तर यंत्रणांची तारांबळ उडाली. मुंबई परिसरातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तर अनेक धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा जमा झाला. 

मुंबईत सखल भागांत पाणी साचले, रस्ते जलमय झाल्याने रस्ते वाहतूक कासवगतीने सुरू होती, तर रेल्वे वाहतुकीलाही पावसामुळे लेटमार्क लागला. दादर, सायन, माटुंगा, परळ, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट परिसरात पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. काही वेळाने वाहतूक पूर्ववत झाली, तर या मुसळधार पावसाचा फटका मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही बसला. गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. दादर येथे नायगाव परिसरात पावसामुळे एक झाड कोसळले; मात्र जीवितहानी झाली नाही. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये ५६ टक्के पाणीसाठा झाला असून सात महिने पुरेल एवढा जलसंचय झाला आहे. 

रायगडात एकाचा मृत्यू 

  • जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला असून सावित्री, गांधारी, काळ, उल्हास, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. 
  • पेण तालुक्यातील खरोशी गावातील बाळगंगा नदीला आलेली भरती आणि पाऊस यामुळे गावात पाणी शिरल्याने रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. 
  • कर्जत तालुक्यातील दहिवलीतर्फे वरेडी-नेरळ रस्त्यावर उल्हास नदीचे पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ते कळंब रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. घर पडल्याने जिल्ह्यात एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे.


मुंबईला ऑरेंज तर पालघरला रेड अलर्ट
दक्षिण ओडिशा तटीय क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह पूर्व आणि पश्चिमेकडील प्रदेशातील हवामान बदलामुळे मुंबईसह राज्यभरात काही ठिकाणी अतिवृष्टी तर बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. 
हीच परिस्थिती गुरुवारी कायम राहील. पालघर, नाशिक आणि पुणे या तीन जिल्ह्यांना गुरुवारी रेड अलर्ट देण्यात आला असून, येथे अतिवृष्टीची शक्यता आहे. तर मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.   

वसईत दोघांचा मृत्यू 
वसईच्या राजावली परिसरातील वाघराळपाडा येथे बुधवारी सकाळी दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचविण्यात यश आले. 
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवली गावातील वाघराळपाडा भागात बुधवारी दरड कोसळण्याची घटना घडली. 
या दरडीखाली एकाच घरातील चार जण अडकले होते. त्यातील अमित ठाकूर (३५) व रोशनी ठाकूर (१४) या दोघा बाप-लेकीचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला.  

पालघर जिल्ह्यात हाहाकार
पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तानसा, वैतरणा, गारगाई, पिंजाळी, देहर्जा या पाचही मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, विक्रमगड येथील धामणी धरण क्षेत्रामध्ये पाणीसाठा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सूर्या नदीमध्ये धरणाचे पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार माजला असून, नद्या, नाले, धरणे तुडुंब भरली आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचा धोका लक्षात घेत ग्रामीण व दुर्गम भागातील सर्व शाळांना दुपारी दोननंतर सुट्टी देण्यात आली.

नवी मुंबईत कोसळधारा 

  • नवी मुंबईसह पनवेलला मंगळवार रात्रीपासून बुधवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले. यामुळे पनवेलमधील पाताळगंगा आणि गाढी या नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. पाताळगंगेच्या पुरामुळे डाेलघरमधील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. 
  • नवी मुंबईसह पनवेल परिसरात वृक्ष कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहेत. 

 

Web Title: Rainstorms disrupting public life in many places Orange alert to Mumbai Red Alert to Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.