रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची सक्ती नको
By admin | Published: September 21, 2016 04:01 AM2016-09-21T04:01:00+5:302016-09-21T04:01:00+5:30
ग्रामीण भागांमध्ये आजच्याघडीला रस्ते, पायवाटा यांची नितांत गरज आहे. नगरसेवकांसाठी असलेला ३१ लाखांचा निधी वापरु द्या.
कल्याण : ग्रामीण भागांमध्ये आजच्याघडीला रस्ते, पायवाटा यांची नितांत गरज आहे. नगरसेवकांसाठी असलेला ३१ लाखांचा निधी वापरु द्या. रेनवॉटर हार्वेस्टींग प्रकल्पाची सक्ती करू नका अशी विनंती स्थायी समितीतील भाजपाचे सदस्य रमाकांत पाटील यांनी सभापती संदीप गायकर यांना केली. यावर रेनवॉटर हार्वेस्टींगसाठी ठेवलेला १० लाखांचा निधी हा त्याच कामासाठी वापरला जाईल. पायवाट, रस्त्यांची कामे उर्वरित २१ लाखांच्या निधीतून करावीत असे स्पष्टीकरण गायकर यांनी केले.
शिवसेना सदस्य राजाराम पावशे यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत स्थायी समितीने सुचविलेली कामे का होत नाहीत? असा सवाल उपस्थित केला. यावर बोलताना प्रशासनाचे ग्रामीण भागाकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचा आरोप भाजपाचे सदस्य रमाकांत पाटील यांनी केला. नगरसेवकांसाठी ६-१५-१० असा एकुण ३१ लाखांचा निधी ठेवला असतानाही आजच्या घडीलाही ग्रामीण भागामध्ये रस्ते चांगले नाहीत. तसेच पायवाटांची कामे झालेली नाहीत.
या कामांची ग्रामीण भागात नितांंत आवश्यकता असून रेन वॉटर हार्वेस्टींगची सक्ती करू नका त्याच्यासाठी ठेवलेला निधीही अन्य कामांसाठी वापरण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी पाटील यांनी केली होती. नगरसेवक निधीतील १० लाखाचा रेनवॉटर हार्वेस्टींगचा हिस्सा हा गटार, पायवाटा या कामांसाठी वापरू नका अशा सूचना नगरसेवकांना केल्या आहेत. तो निधी कुठेही वापरायचा नाही असे सभापती गायकर यांनी सुनावले. रेनवॉटर हार्वेस्टींग प्रकल्पाची जुन्या बांधकामांमध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला विलंब का होतोय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा प्रकल्प ज्याठिकाणी राबविणे शक्य नसेल त्या ठिकाणच्या नगरसेवकांनी त्या निधीतून कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारावा अशा सूचना गायकर यांनी केल्या. (प्रतिनिधी)
> आराखडा तयार
ग्रामीण भागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले हा आरोप चुकीचा आहे. २७ गावांमधील जी विकासकामे करायची आहेत त्यासंदर्भात आयुक्त इ रवींद्रन यांच्याबरोबर संबंधित गावांमधील नगरसेवकांची बैठक झाली आहे. यात नियोजनबध्द विकासकामांचा आराखडा तयार करण्यात आला असून याअंतर्गत गावांमधील २१ रस्त्यांची कामे घेण्यात आली आहेत असे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी बैठकीत सांगितले.