पावसाच्या पाण्याचा ठेवणार हिशेब
By Admin | Published: January 11, 2017 04:41 AM2017-01-11T04:41:19+5:302017-01-11T04:41:19+5:30
योग्य जलव्यवस्थापनाद्वारे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्यातील ९७ गावांत जलव्यवस्थापन समिती स्थापण्यात येणार आहे.
पुणे : योग्य जलव्यवस्थापनाद्वारे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्यातील ९७ गावांत जलव्यवस्थापन समिती स्थापण्यात येणार आहे. पडणाऱ्या पावसाचा हिशेब या माध्यमातून ठेवण्यात येणार असून, त्या आधारेच पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याचे नियोजन केले जाणार आहे.
जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात ‘जलस्वराज्य-२’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत दुष्काळी, भूजल शोषित व दुषित जलस्त्रोत असलेल्या गावांमध्ये विविध जल योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे, सातारा, जळगाव, नगर, बुलडाणा, अमरावती व औरंगाबाद येथील ९७ गावांत ही मोहीम राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून गावातील पेय जल व पिकांसाठी लागणऱ्या पाण्याचे नियोजन केले जाणार आहे.
या गावांमध्ये पडणाऱ्या पावसाचे क्षेत्र निर्धारीत करण्यात आले आहे. त्या नुसार क्षेत्रात पडणारा पाऊस, पावसामुळे उपलब्ध होणारे पाणी, पिण्यासाठी, शेती व जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याचा हिशेब केला जाणार आहे. या शिवाय पावसाचे भूजलात रुपांतरीत होणारे पाणी, विविध जलस्त्रोतांत साठलेले पाणी, वाहून जाणारे व जमिनीत ओलाव्याच्या स्वरुपात राहणाऱ्या पाण्याचा ताळेबंद समितीच्या माध्यमातून मांडण्यात येईल. त्या आधारे गावाची पाण्याची गरज आणि पाणी साठविण्याच्या उपयायोजना आखण्यात येणार आहेत.
राज्यात सरासरी ८ गावांचे असे जलधर क्षेत्र निर्धारीत करण्यात आले आहे. या प्रत्येक गावांतील एक सदस्य या समितीवर असेल. पंचायत समितीचा सभापती या समितीचा अध्यक्ष असेल. शिवाय भूजल विभागातील तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी अशा १६ जणांची ही समिती असेल. ती साधारण मार्चपासून कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक सुनील पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)