पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यात रिमझिम पाऊस
By admin | Published: October 26, 2014 12:50 AM2014-10-26T00:50:47+5:302014-10-26T00:50:58+5:30
रब्बीसह खरिप पिकांनासाठी ठरणार उपयुक्त
अकोला: रब्बी हंगामातील पेरण्यांसाठी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा केली जात असतानाच, शनिवारी पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशिम या चार जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. विभागातील यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. हा पाऊस रब्बी पेरण्यांसह खरीप पिकांसाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे, कृषी विभागाचे म्हणणे आहे.
यावर्षी पावसाळ्यास तब्बल सव्वा महिना उशिराने झालेला प्रारंभ आणि त्यानंतरही पावसाचे कमी प्रमाण, यामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद इत्यादी कमी कालावधीच्या पिकांची अत्यल्प प्रमाणात पेरणी झाली. दुसरीकडे गत काही वर्षांपासून, कापसाला मागे टाकून विभागातील प्रमुख पिकाचा मान पटकाविलेल्या सोयाबीनचे एकरी उत्पादन केवळ ५0 किलो ते एक क्विंटलपर्यंत घसरल्याने, पश्चिम विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके बुडाल्याने, यंदा शेतकरी दिवाळी साजरी करू शकला नाही.
खरिपातील नुकसान निदान रब्बी हंगामात तरी भरुन काढता येईल, या आशेने शेतकर्यांनी रब्बी हंगामातील पेरणीची तयारी सुरु केली असली तरी, जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नसल्याने, अद्यापही सार्वत्रिक रब्बी पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. शेतकर्यांना रब्बी पेरण्यांसाठी पावसाची प्रतीक्षा होती. शनिवारी सकाळपासूनच अकोला, बुलडाणा जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली, तर अमरावती व वाशिम या दोन जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस झाला. यवतमाळसह विभागातील पाचही जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. रिमझिम पावसामुळे हरभरा, करडी आदी रब्बी पिकांच्या रखडलेल्या पेरण्या सुरू होण्याची अपेक्षा, कृषी विभागातर्फे व्यक्त केली जात आहे. हा पाऊस
खरीप हंगामातील कपाशी पिकासाठीही उपयुक्त ठरणार आहे.
रिमझिम पाऊस हरभरा, करडी आदी रब्बी पिकांसह, खरीप हंगामातील कपाशी पिकासाठीही उपयुक्त ठरणार आहे. पाऊस झालेल्या भागात शेतकर्यांनी रब्बी पिकांची पेरणी सुरु करण्यास अडचण नाही. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास, कपाशी पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी सह संचालक एस. आर. सरदार यांनी वर्तवली आहे.
*सोयाबीन भिजले!
शनिवारी झालेल्या रिमझिम पावसामुळे कापणी न झालेले सोयाबीन पावसामुळे शेतातच भिजले. कापणीला आलेले सोयाबीन भिजल्याने, शेतकर्यांचे नुकसान झाले. आधीच उत्पादन कमी असल्याच्या स्थितीत हाताशी आलेले सोयाबीन भिजल्याने, शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
*कपाशीवर किडींच्या प्रादुभार्वाची शक्यता!
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. हे वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास, कपाशी पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता, कृषी तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.