आठवडाभर दडी मारलेल्या पावसाचे दमदार पुनरागमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 06:26 AM2018-06-18T06:26:44+5:302018-06-18T06:26:44+5:30
शहर-उपनगरात शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली.
मुंबई : शहर-उपनगरात शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, कोसळत्या सरींमध्येही रेल्वेची वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. रविवार विशेष वेळापत्रकामुळे रेल्वे रुळांवर लोकल फेऱ्यांची संख्यादेखील कमी असल्याने, पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला नाही.
मध्य रेल्वेच्या नेहमीच्या पाणी भरणाºया ठिकाणांहून योग्य प्रकारे पाणी वाहून गेल्यामुळे याचा फायदा रेल्वेला झाला. विश्रांती घेत कोसळणाºया धारेमुळे मुंबईकरांनीदेखील पावासाचा आनंद घेतला. सुट्टी असल्यामुळे अनेकांनी कुटुंबीयांसमवेत मरिन ड्राइव्ह, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी येथे गरमागरम चहा आणि भजी खात पावसाचा आनंद घेतला. रविवार असल्यामुळे लोकल फेºयांची संख्या कमी होती. यामुळे स्थानकात विशेषत: दादर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. उर्वरित पावसाळ्याच्या काळातदेखील मध्य रेल्वेने अशा प्रकारे योग्य नियोजन करून, ७५ लाखांहून अधिक प्रवाशांची लाइफलाइन सुरळीत चालू ठेवावी, असा विश्वास प्रवासी व्यक्त करत आहे.
>ठाणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
ठाणे : आठ दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून हजेरी लावली असून मागील २४ तासांत २०५ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला असून ठाणे शहरात सकाळी ८ वाजतादरम्यान वेगवेगळ्या दोन ठिकाणी सहा गाड्यांवर झाडे उन्मळून पडल्यामुळे नुकसान झाले. भिवंडीतही
झाडे कोसळण्याच्या घटनांची
नोंद आहे. दिवसभर पावसाच्या सरीवर सरी सुरूच असल्याने ठाणेकरांनी उकाड्यापासून काही प्रमाणात सुटका झाल्याने आनंद व्यक्त केला.
ठाणे शहरातील तीनहातनाका आणि घोडबंदर रोड येथे पार्क केलेल्या सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती कक्षाने दिली. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ शहरांतील बहुतांशी ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.
नवी मुंबईत दमदार हजेरी
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी पहाटेपासूनच नवी मुंबईसह पनवेलमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे रस्त्याने पाण्याचे पाट वाहत होते, तर काही ठिकाणी पाणी साचून तळे निर्माण झाले होते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दिवसभरात सरासरी ४०.४२ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली
आहे. त्यात सर्वाधिक ५०.९ मि.मी. पाऊस वाशी विभागात पडला
आहे. अनेकांनी नेमक्या सुटीच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याचा फायदा उचलत सहलीचाही आनंद घेतला.
कोल्हापूर, सांगलीत पुनरागमन
आठवडाभरानंतर कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पावसाचे पुनरागमन झाले. सांगली, शिराळ््यात पावसाने हजेरी लावली.
>चौपाट्यांवर पर्यटकांची गर्दी
मुंबई शहरात फोर्ट, भायखळा, गिरगाव, मरिन ड्राइव्ह, वरळी, चिंचपोकळी, दादर, माहिम आणि सायनसह लगतच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार, विक्रोळी, मुलुंड, भांडुप आणि पवई येथे जोरदार पाऊस पडला. पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, गोरेगाव आणि बोरीवली येथे पावसाचा जोर अधिक होता.
ऐन रविवारी पावसाने हजेरी लावल्याने चौपाट्यांवर पर्यटकांची गर्दी झाली होती. गिरगाव, गेट वे आॅफ इंडिया, दादर, जुहू आणि वर्सोव्यासह वरळी सीफेस येथे मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात धाव घेतली. समुद्राच्या फेसाळणाºया लाटा आणि पावसाचे टपोरे थेंब, अशा काहीशा वातावरणात मुंबई न्हाऊन निघाली होती.
रविवारचा मेगाब्लॉक आणि पाऊस, अशा दुहेरी घटनांमुळे मुंबईकरांना काही अंशी त्रास झाल्याचे चित्र होते. मात्र, अनेक दिवसांनी दाखल झालेल्या वरुण राजामुळे हवेत गारवा आल्याने मुंबईकर सुखावले.
>जव्हार, वसईत पाऊस; उर्वरित जिल्हा कोरडाच
पालघर : जिल्हयातील वसई आणि जव्हार, मनोरमध्ये शनिवारी आणि रविवारी चांगला पाऊस झाला. मात्र, उर्वरीत जिल्हयात पावसाने दडी मारली होती. अजूनही शेतकरी बियाणे खरेदी करीत असल्याचे दिसत असून बहुतांशी शेतकºयांनी पेरणीची कामे हाती घेतली आहेत. मुसळधार पाऊस न पडल्याने जमिनीला पेरणीसाठी हवा असलेला वाफसा आलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस व्हावा यासाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
वसई तालुक्यात गेल्या कित्येक दिवसा पासून पाऊस नसल्याने शेतकरी राजा चितेंत होता. पाऊस नसल्याने पेरण्या खोंळबल्या होत्या. तर काही शेतकºयांनी विहिरीच्या पाण्यावर पेरण्या केल्या होत्या. परंतु रविवारी पावसाने चांगलीच हजेरी लावली. सकाळ पासूनच आभाळ भरून आले व अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने शेतकरी समाधानी झाले.
जव्हार तालुक्यात शनिवार पासून चांगला पाऊस झाला काल रमजान ईदची नमाज संपताच पावसाची संतत धार सुरू झाली असून वातावरण थंड झालले आहे. मात्र शुक्र वार पासून वीज वारंवार खंडित होत असून आज रविवारी ही वीजेचा लपंडाव सुरू आहे. आजही पावसाने चांगलीच सुरवात केल्यामुळे बळीराजाही पेरणीच्या व शेतीच्या कामाला लागला आहे. मनोर परिसरात सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली ग्रामीण भागातील शेतकरी भात शेती ची अवजारे परजू लागले आहेत.
विक्रमगडमध्ये पावसाने शनिवारी रात्री पासून जोरदार हजेरी लावली तर रविवारी ही पावसाचा जोर कायम राहत शिवार भरल्याने पेरणी नंतर आकाशाकडे डोळे लाऊन बसलेला बळीराजा मात्र या पावसामुळे सुखावला.
बोईसरला पावसाचे वातावरण होते. एक दोन वेळा फक्त थोडा वेळ रिमझिम पाऊस येऊन गेला. मात्र, संध्याकाळी तो पडला नाही. दिवसभर वीज नव्हती म्हणून उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.
पालघर डहाणू, तलासरी, मोखाडा, वाडा, पालघर या तालुक्यात पावसाचे चिन्हही नव्हते त्यामुळे तेथील बळीराजा हा चिंतातूर झाला आहे.
>सहा कार, एका दुचाकीचे नुकसान
जोगेश्वरी परिसरात इमारतीची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र, या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. पावसामुळे दोन इमारतींमध्ये असलेली ही संरक्षण भिंत कमकुवत झाली होती. त्यामुळे रहिवाशांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भिंतीजवळील भाग रिकामा केला होता. अखेर शनिवारी रात्री ही भिंत कोसळली. या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेत सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले.
>रायगड जिल्ह्यात धो-धो; शेतकरी सुखावला
अलिबाग : रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी
सुखावले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात ३३४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर परिसरात वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. घरे, दुकाने तसेच शासकीय गोदामांचे पत्रे, कौले उडाल्याने लाखोंची हानी झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. तहसील कार्यालयाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली असून पंचनामे करण्यात आले आहेत. वादळी वाºयामुळे झाड कोसळल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
वीकेंडमुळे अनेकांनी पावसाळी सहलींचे आयोजन केले होते. त्यामुळे अलिबाग, किहिम, मुरुड परिसरात पर्यटकांची समुद्र किनाºयावर गर्दी होती.
>दक्षिण कोकणात पावसाचा इशारा
कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. पुढील दोन दिवस दक्षिण कोकण, गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे़