पावसाचं पुनरागमन
By admin | Published: July 13, 2017 08:27 PM2017-07-13T20:27:19+5:302017-07-13T20:27:19+5:30
उत्तर प्रदेश व परिसरावर गेले काही दिवस असलेला कमी दाबाचा पट्टा आता मध्य प्रदेशकडे सरकला आहे़ त्याचवेळी पश्चिम राजस्थान
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - उत्तर प्रदेश व परिसरावर गेले काही दिवस असलेला कमी दाबाचा पट्टा आता मध्य प्रदेशकडे सरकला आहे़ त्याचवेळी पश्चिम राजस्थान ते पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गुजरातसह राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे पुनरागमन झाले आहे़ या आठवड्यात कोकण, गोव्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ संपूर्ण देशभरात येत्या २६ जुलैपर्यंत पाऊस नेहमीपेक्षा अधिक असण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे.
मध्य प्रदेश व परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुजरातमध्ये आणखी दोन दिवस जोरदार पाऊस पडेल़ तसेच सौराष्ट्र, कच्छ भागात १५ व १६ जुलैला अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गुरुवारी दिवसभरात कोकण, गोव्यात ब-याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे ७, लोहगाव ५, जळगाव १, कोल्हापूर १, महाबळेश्वर २३, नाशिक ४, सातारा ०़३, मुंबई २२, सांताक्रुझ १५, अलिबाग १८, रत्नागिरी ८, डहाणु ०़४, औरंगाबाद २, परभणी ०़५, अकोला ०़३, ब्रम्हपुरी १, गोंदिया ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यात विक्रमगड ८०, जव्हार, पालघर, वाडा ७०, डहाण, मोखेडा ६०, भिरा, काणकोण, दोडामार्ग, कणकवली, मांडणगड, म्हापसा, फोंडा, सांकेलम, शहापूर, सुधागड पाली, तलासरी, वाल्पोई ३० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रात इगतपुरी ७०, महाबळेश्वर ६०, रावेर ५०, पेठ ४०, हरसूल, मुक्ताईनगर, एदलाबाद, राधानगरी, शिरपूर, त्र्यंबकेश्वर, यावल ३० मिमी पाऊस झाला़ मराठवाड्यात गंगाखेड, माहूर, सिलो १० मिमी पाऊस पडला़ विदर्भात चिखलदरा ५०, धारणी ३०, अमरावती, बुलढाणा, जळगाव जामोद, मलकापूर, मारगाव, राळेगाव, वरोरा २० मिमी पाऊस झाला़ घाटमाथ्यावर अम्बोणे, दावडी, डुंगरवाडी, ताम्हिणी ४०, कोयना ३० मिमी पाऊस पडला आहे.
येत्या २४ तासात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, विदर्भात ब-याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
इशारा-
* १४ जुलै - उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार, उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार तर दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता.
* १५ जुलै - उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता
१६ व १७ जुलै - कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
महाराष्ट्राच्या दृष्टीने सध्या अनुकुल स्थिती आहे़ पुढील २ ते ३ दिवस विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे़ मराठवाड्यात अजून तशी परिस्थिती नाही़ तेथे हलका पाऊस होण्याची शक्यता आहे़ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र तयार होत असून त्यावर आमचे लक्ष आहे़ १६ जुलैनंतर ते सक्रीय होण्याची शक्यता आहे़ त्याचा परिणाम पुढील काळात मराठवाड्यासह सर्वत्र चांगला पाऊस होऊ शकतो़ सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे़ हा पाऊस आणखी २ ते ३ दिवस सुरु राहील़
ए़ के़ श्रीवास्तव, वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ, पुणे