मुंबईत पावसाची विश्रांती
By admin | Published: August 4, 2016 04:47 AM2016-08-04T04:47:54+5:302016-08-04T04:47:54+5:30
गेल्या चार दिवसांपासून शहर आणि उपनगरांत कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी विश्रांती घेतली
मुंबई : गेल्या चार दिवसांपासून शहर आणि उपनगरांत कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी विश्रांती घेतली असली, तरी पडझडीच्या घटना सुरूच आहेत. मागील २४ तासांत शहरात ८.३३ मिलीमीटर, पूर्व उपनगरांत १७.३१ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरांत १४.४१ मिलीमीटर पाऊस पडला. शहर आणि उपनगरांत ३ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. २९ ठिकाणी झाडे पडली, तर येत्या ४८ तासांत कोकण-गोव्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
मुंबई शहरासह उपनगरांत बुधवारी तुरळक ठिकाणी पाऊस झाला. तरीही पडझडीच्या घटना घडतच होत्या. शहरात एक, पूर्व उपनगरांत एक आणि पश्चिम उपनगरांत एक अशा एकूण तीन ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. शहरात सात, पूर्व उपनगरांत तीन आणि पश्चिम उपनगरांत १९ अशा एकूण २९ ठिकाणी झाडे पडली. चेंबूर आरसीएफ मार्गावरील तलावात तरुण पडला. त्याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. वैभव संतोष जाधव (१८) असे मृत तरुणाचे नाव
आहे. (प्रतिनिधी)
>हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर बंगालचा उपसागर आणि लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता वायव्य बंगालच्या उपसागराच्या पश्चिम बंगाल-उत्तर ओडिशा किनारपट्टीलगत आहे. त्याचा परिणाम शहरातील पर्जन्यमानावर होणार आहे
मागील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण-गोव्यात, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.
कोकण, गोवा आणि विदर्भासाठी इशारा
४ ते ५ आॅगस्ट - कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
६ आॅगस्ट - कोकण, गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
मुंबईसाठी अंदाज
येत्या २४ तासांत शहर आणि उपनगरांत पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८, २५ अंशाच्या आसपास राहील.