आठवडाभर राज्यात पाऊस बरसणारच
By Admin | Published: July 19, 2016 05:24 AM2016-07-19T05:24:37+5:302016-07-19T05:24:37+5:30
किनारपट्टीलगत विरळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने, येत्या ७२ तासांसाठी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कायम राहील
मुंबई : पश्चिम समुद्र किनारपट्टीवर दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत विरळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने, येत्या ७२ तासांसाठी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. शिवाय, पूर्व मध्य अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलामुळे राज्याच्या किनारपट्टीसह गोवा आणि गुजरात किनारपट्टीवर सुरू असलेला पाऊसही कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मागील चोवीस तासांत कोकण-गोव्यात काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. १९ जुलै रोजी कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. २० जुलै रोजी कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २१ आणि २२ जुलै रोजी कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. (प्रतिनिधी)