पावसाळी ट्रेकमध्ये आहे धोका!
By admin | Published: June 28, 2016 02:40 AM2016-06-28T02:40:59+5:302016-06-28T02:40:59+5:30
दगड पडून दोन ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याने पावसाळी ट्रेकिंग धोकादायक ठरू शकते, असा मुद्दा तरूणांमध्ये चर्चेत आला आहे.
प्रज्ञा म्हात्रे, जान्हवी मोर्ये
ठाणे, डोंबिवली- दगड पडून दोन ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याने पावसाळी ट्रेकिंग धोकादायक ठरू शकते, असा मुद्दा तरूणांमध्ये चर्चेत आला आहे. ज्या ठिकाणी ट्रेकिंगला जाणार आहात, त्या जवळच्या गावाशी संपर्क हवा, प्रथमोपचाराचे ट्रेनिंग हवे आणि मुख्य म्हणजे ट्रेकिंगचा अनुभव हवा, असे मत जाणकार ट्रेकर्सनी मांडले आहे. धोका हा कोणत्याही ट्रेकमध्ये असतो, पण पावसाळी ट्रेकमध्ये आकस्मिक धोके खूप असतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘मिड अर्थ’ या ट्रेकिंग संस्थेचे सुरेंद्र देसाई म्हणाले, काही जण ट्रेकिंगचे साहित्य घेऊन जात नाहीत. अनेकांना प्रशिक्षण नसते. त्यांचे धाडस हे केव्हाही जीवावर बेतू शकते. ज्या ठिकाणी आपण जातो. तेथील भौगोलिक माहिती असावी. नसल्यास त्याठिकाणच्या वाटाड्याकडून करुन घ्यावी. जाणकार माहितगार माणूस सोबत असावा. ट्रेकिंगचा पोषाख सुटसुटीत असावा. वृक्षतोड थांबल्याशिवाय दरड व दगड कोसळण्याच्या घटनांना आळा बसणार नाही.
पावसाळ््यात असे अपघात होतात. दगड व दरड कोसळण्याच्या घटना घडतात, याकडे ट्रेकर विशाल साटम यांनी लक्ष वेधले. लोक साहस करतात. त्यात काही मंडळी हौशी असतात. नवख्यांसोबत अशी दुदैवी घटना घडते, असे नाही. एखाद्या अनुभवी व जाणकार ट्रेकर्सचाही जीवही अपघातात जाऊ शकतो. ट्रेकिंग आणि पिकनिक यात फरक आहे, याचे भान सगळ््यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे.
ट्रेकर्स सागर राणे यांनी सांगितले, ट्रेकिंगला जाताना काळजी घेतली पाहिजे. अनेकदा जंगलात विषारी साप असतात. त्यांच्यापासून कसा बचाव करायचा, एखादी दरड कोसळली. दगड कोसळला तर काय करायचे. याची माहिती जाणून घेतल्यास अपघात टाळता येऊ शकतो. ट्रेकिंगला जाताना बेस कॅम्पच्या ठिकाणी पायथ्याच्या गावातील नागरिकांना कल्पना द्यावी. पावसाळी ट्रेकिंगमध्ये धोका असतो. दरड कोसळणे, घसरून पडणे असे प्रकार घडतात. उत्साहाच्या भरात अतिसाहस टाळावे. कारण दगड पडण्याच्या घटना घडत असतात, याकडे अॅडव्हेंचर गुरूचे प्रमुख मिथुन कसबेकर यांनी लक्ष वेधले. प्रत्येकाने मेडिकल किट जवळ बाळगावे. अनेकदा आजूबाजूला औषधोपचाराची सोय नसते.
>पावसात सुरूवातीच्या काळात निसरडे असते. त्यामुळे ट्रेकिंगवेळी खूप काळजी घ्यावी लागते, असे पॅन्थर्स ट्रेकिंग अॅण्ड अॅडव्हेंचर ग्रुपच्या प्रमुख धनश्री कोळमकर यांनी सांगितले. ट्रेकिंगसाठी हंटर शूज करुन मिळतात. त्याने ग्रीपही चांगली मिळते. कुठे मोबाईल वापरावा, कुठे वापरु नये याचे भान गरजेचे आहे. डोंगरावर खूप वारा सुटलेला असतो. त्यामुळे कड्याच्या ठिकाणी सेल्फी टाळावी. रस्ता अरुंद असेल आणि निमुळती चढण असेल तेथे रोपचा आधार घ्यावा. वैयक्तिक मेडिकल किटसोबत प्रथमोपचाराचे साहित्यही बाळगावे.