कोरड्या हवामानासह पावसाचा इशारा
By admin | Published: February 23, 2016 01:07 AM2016-02-23T01:07:44+5:302016-02-23T01:07:44+5:30
किमान तापमानात कमालीची वाढ होत असतानाच राज्याच्या वातावरणात उल्लेखनीय बदल नोंदवण्यात येत आहेत. मागील चोविस तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदवण्यात आले
मुंबई : किमान तापमानात कमालीची वाढ होत असतानाच राज्याच्या वातावरणात उल्लेखनीय बदल नोंदवण्यात येत आहेत. मागील चोविस तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदवण्यात आले आहे. २४ फेब्रूवारीपर्यंत गोव्यासह संपुर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २५ आणि २६ फेब्रूवारी रोजी मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील ऊन्हाचा चटका वाढत असून, दिवसभर पडणाऱ्या ऊन्हामुळे मुंबईकरांच्या शरीरावरून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत.
मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे. सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे १५.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
मराठवाड्याच्या संपुर्ण भागात तर मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात
सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)