पावसाळी कामांना सुरुवातच नाही
By admin | Published: May 19, 2016 01:41 AM2016-05-19T01:41:14+5:302016-05-19T01:41:14+5:30
अनेक ठिकाणचे नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांचे टेंडर काढण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
पुणे : मे महिना संपण्यास दहा ते बारा दिवस शिल्लक राहिले असतानाही अद्याप शहरातील अनेक ठिकाणचे नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांचे टेंडर काढण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे यंदा बहुतांश ठिकाणच्या सफाईची कामे कागदावरच राहण्याची भीती आहे.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नाले, पावसाळी गटारे यांच्या सफाईची कामे योग्य पद्धतीने पार पाडणे आवश्यक बनले आहे. अन्यथा हे नाले, गटारे तुबूंन शहरामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
१२ दिवसांत कामे कशी पूर्ण करणार ?
दर वर्षी नाले, गटारे सफाईची पावसाळी कामे ३१ मेपूर्वी पूर्ण केली जातात. आता मे महिना संपण्यास केवळ १२ दिवस उरले आहेत. मात्र, यंदा अनेक क्षेत्रीय कार्यालयांचे नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांचे टेंडरच अद्याप काढण्यात आले नाही. त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन वर्कआॅर्डर कधी काढली जाणार आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरुवात होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नाल्यांची परिस्थिती खूपच वाईट
शहरामध्ये वारजे, शिवाजीनगर, प्रभात रोड, औंध, बावधन, कोथरूड, पाषाण, बाणेर, विश्रांतवाडी, येरवडा, खराडी, हडपसर, कोंढवा, कोरेगाव पार्क, कॅम्प, मार्केटयार्ड, नवी पेठ, अलका चौक, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, धायरी या परिसरातून प्रमुख २७ नाले वाहतात. वर्षभर या नाल्यांमध्ये प्लॅस्टिक, राडारोडा व इतर विविध प्रकारचा कचरा अडकून पडलेला आहे. या नाल्यांची सफाई न झाल्यास पावसाळयामध्ये पाण्याचा मोठा प्रवाह नाल्यातून वाहू लागल्यानंतर पुरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नाल्याच्या परिसरामधील घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
>पालिका आयुक्तांकडूनच दुर्लक्ष
महापालिकेच्या कामाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून पावसाळी पूर्व कामांकडे पाहिले जाते. एप्रिल महिन्यात आयुक्तांकडून सर्व विभागप्रमुख व क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाते.
त्यानंतर कामे वेळेत व्हावीत, याकरिता आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त, झोनचे उपायुक्त, क्षेत्रीय अधिकारी सातत्याने या कामांवर लक्ष ठेवून असतात. मात्र, यंदा महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडून पावसाळी कामांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले असल्याची टीका नगरसेवकांकडून केली जात आहे.