रायगडसाठी देणार दीडपट निधी

By admin | Published: January 22, 2016 03:32 AM2016-01-22T03:32:51+5:302016-01-22T03:32:51+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पुनर्विकासासाठी तसेच या गडाला शिवकालीन वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही

Raipur: | रायगडसाठी देणार दीडपट निधी

रायगडसाठी देणार दीडपट निधी

Next

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पुनर्विकासासाठी तसेच या गडाला शिवकालीन वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी दिली. सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित रायगड महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत
होते.
‘जागतिक नकाशावर रायगड झळकावा हा या महोत्सवामागचा उद्देश आहे. महोत्सवातून पर्यटनाला चालना मिळेल,’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘छत्रपतींचा इतिहास केवळ त्यांच्या शौर्यापुरताच मर्यादित नव्हता. रयतेचा पालक कसा असू शकतो हे त्यांनी साऱ्या जगाला दाखवून दिले होते. राज्यात सत्तेवर आल्यानंतर आम्ही, महाराष्ट्रातील पाच
महत्त्वाच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत आराखडा तयार केला आहे. त्यात रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी १२ कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे.
मात्र रायगड किल्ल्याच्या पुनर्बांधणी व पुनर्विकासासाठी अर्थमंत्री घोषित करतील त्याच्या दीडपट निधी मंजूर केला जाईल,’ अशी घोषणाही फडणवीस यांनी या वेळी केली. ‘राज्यासह केंद्रातही आम्ही सत्तेवर आहोत त्यामुळे पुरातत्त्व विभागाला राज्य शासनाकडून दिलेला रायगड विकासाबाबतचा
प्रस्ताव जसाच्या तसा मंजूर होईल,’ असेही फडणवीस यांनी या वेळी
स्पष्ट केले.
शिवसृष्टी साकारणाऱ्या कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे त्यांनी याप्रसंगी कौतुक केले. (विशेष प्रतिनिधी)
केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी ‘या महोत्सवामुळे रायगडचा इतिहास जिवंत होऊन त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल,’ असा विश्वास व्यक्त केला. ‘गडावर पूर्वी शिवरायांना दिली जाणारी शासकीय मानवंदना काही वर्षांपासून खंडित झाली आहे. ती मानवंदना पुन्हा सुरू करावी,’ अशी मागणीही गीते यांनी या वेळी केली.कार्यक्रमाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, माजी मंत्री आमदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार जयंत पाटील, आमदार विनायक मेटे, पोलीस उपमहासंचालक प्रकाश बोरुडे, कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, सांस्कृतिक संचालक अजय आंबेकर उपस्थित होते.
अलिबाग : राणीवसा, पालखी दरवाजा, होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वराचे
मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, नगारखाना, राजसदरेवरील मेघडंबरी या स्थळांना भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शिवकालीन इतिहासाचा अनुभव घेतला. त्यांनी समाधी व राजसदर येथील सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला आदरांजली वाहिली. राजसदर येथे मुख्यमंत्र्यांसमोर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे भव्य व अत्यंत देखणे नाट्य सादर करण्यात आले. जवळपास दीड तास मुख्यमंत्र्यांनी शिवकालीन इतिहास अनुभवला. छत्रपतींच्या काळातील पारंपरिक टाळनृत्य, दांडपट्टा, कसरतीचे मर्दानी खेळ, ढोल-ताशे यांनी उपस्थितांना शिवकाळाची झलक दाखविली. शिवरायांच्या काळात रायगड कसा होता याचे साक्षात रूप साकारण्यात आले आहे. याचा आनंद व समाधान वाटत असल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘महाराजांचे नियोजन, दूरदृष्टी, स्थापत्यशास्त्र तसेच गतकालीन संस्कृती आदी बाबींची जाणीव व माहिती नव्या पिढीला या महोत्सवामुळे होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

Web Title: Raipur:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.