कमळ चिन्ह घेणाऱ्या उमेदवारांना रिपाइंचा नारळ
By Admin | Published: February 9, 2017 12:21 AM2017-02-09T00:21:15+5:302017-02-09T00:21:15+5:30
भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या पुणे, सोलापूर येथील रिपाइं (आठवले गट)च्या उमेदवारांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे
मुंबई : भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या पुणे, सोलापूर येथील रिपाइं (आठवले गट)च्या उमेदवारांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. लोणावळा येथे झालेल्या आरपीआयच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्य सरचिटणीस राजा सरवदे यांनी ही घोषणा केली.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंने भाजपासोबत फक्त मुंबई महापालिकेसाठी युती केली असून, उर्वरित नऊ महापालिकेत पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहे.
अन्य नऊ महापालिकेसाठीही रिपाइंने युतीचा प्रस्ताव भाजपाला दिला होता. मात्र, भाजपाने त्या प्रस्तावावर निर्णय न घेता, रिपाइंच्या उमेदवारांना परस्पर कमळ चिन्ह दिले आहे. त्यामुळे आठवले यांच्या आदेशानुसार मुंबई वगळता अन्य महापालिकेत रिपाइं स्वबळावर निवडणूक लढत असल्याची घोषणा करण्यात आली. (प्रतिनिधी)