गुणवत्ता नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणा उभारणार
By admin | Published: December 23, 2014 12:03 AM2014-12-23T00:03:27+5:302014-12-23T00:03:27+5:30
डांबरीकरण केल्यानंतर काही दिवसातच उखडणारे रस्ते, शासकीय इमारतींच्या नव्या बांधकामाला जाणारे तडे अशा प्रकारच्या
नागपूर : डांबरीकरण केल्यानंतर काही दिवसातच उखडणारे रस्ते, शासकीय इमारतींच्या नव्या बांधकामाला जाणारे तडे अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामांना आता चाप बसणार आहे. महापालिका, नगरपरिषदांमध्ये होणारे रस्ते व विविध विकास कामांवर गुणवत्ता नियंत्रणासाठी एक सक्षम यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल,अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
परळी वैजनाथ नगर परिषदेंतर्गत रस्त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याकडे आर.टी. देशमुख यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले. या लक्षवेधीच्या निमित्ताने डॉ. सुनील देशमुख, राजेश टोपे यांच्यासह इतर सदस्यांनीही विकास कामांच्या दर्जावर चिंता व्यक्त करीत गुणवत्तेवर ‘थर्ड पार्टी चेक’राहण्याची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही याला दुजोरा दिला. कोणत्या रस्त्याची दुरुस्ती करावी, कुठे नवीन करावा याची काही मानके नाहीत. त्यामुळे एकच काम वारंवार केले जाते व तेच पुन्हा पुन्हा खराब होते. यातून निधीचा अपव्यय होते. अशा कामांसाठी असलेली मानकेही बरीच जुनी झाली आहेत. येत्या काळात दुरुस्ती व नव्या कामांसाठी मानके नव्याने तयार केली जातील. यासाठी एकत्रित धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)