आंबेडकर स्मारक लोकसहभागातून उभारा - दलाल
By admin | Published: October 6, 2015 03:07 AM2015-10-06T03:07:36+5:302015-10-06T03:07:36+5:30
राजकारण्यांबद्दल सध्या मीडियापासून मतदारांपर्यंत टीकेचा सूर लावला जात असताना माजी विधान परिषद सदस्य प्रभाकर दलाल यांनी इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहत असलेल्या
मुंबई : राजकारण्यांबद्दल सध्या मीडियापासून मतदारांपर्यंत टीकेचा सूर लावला जात असताना माजी विधान परिषद सदस्य प्रभाकर दलाल यांनी इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उभारणीकरिता ५ हजार रुपयांची देणगी दिली आहे. राज्य आर्थिक अडचणीत असताना लोकसहभागातून हे स्मारक उभे करा, अशी सूचना दलाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
दलाल मूळचे काँग्रेसचे. त्यानंतर त्यांनी एस.एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी चळवळीत सहभाग घेतला. दलाल यांचे वय ८९ वर्षे असून, ते १९६८ ते ७४ या कालावधीत विधान परिषदेचे सदस्य होते.
दीर्घकाळ चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम केलेल्या दलाल यांनी मुख्यम^ंत्र्यांना पत्र लिहिले व त्यासोबत मुख्यमंत्री निधीत स्मारकासाठी
५ हजारांचा धनादेश पाठवून दिला. दलाल पत्रात म्हणतात की, या स्मारकाची बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा होती. स्मारकाकरिता अनेक कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे वृत्तपत्रात वाचले. पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक ठरणारे हे स्मारक उभे राहिलेच पाहिजे. मात्र त्याकरिता सर्व खर्च शासनाने करणे बरोबर नाही. लोकसहभागातून स्मारक उभे राहण्याकरिता शासनाने निम्मा खर्च करावा व निम्मा खर्च या स्मारकाची मागणी सातत्याने लावून धरणारे, यापूर्वी याच स्मारकाकरिता ज्यांनी प्रयत्न केले त्यांनीही केला पाहिजे. (विशेष प्रतिनिधी)