सोमनाथच्या धर्तीवर राम मंदिर उभारा; विश्व हिंदू परिषदेने केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 01:57 AM2018-11-22T01:57:23+5:302018-11-22T02:00:36+5:30
अयोध्येत राम मंदिराची निर्मिती व्हावी, ही देशातील कोट्यवधी नागरिकांची भावना आहे. जर न्यायालयीन प्रक्रियेला उशीर लागत असेल तर सरकारने अध्यादेश जारी करावा किंवा कायदा करावा.
नागपूर : अयोध्येत राम मंदिराची निर्मिती व्हावी, ही देशातील कोट्यवधी नागरिकांची भावना आहे. जर न्यायालयीन प्रक्रियेला उशीर लागत असेल तर सरकारने अध्यादेश जारी करावा किंवा कायदा करावा. सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर अध्यादेश जारी करुन राम मंदिराची उभारणी झाली पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर रोजी नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत हा मुद्दा ‘विहिंप’तर्फे मांडण्यात आला.
पत्रपरिषदेला विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ अध्यक्ष राजेश्वर निवल, आयोजन समितीचे अध्यक्ष संजय भेंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे, आदी उपस्थित होते.
२५ नोव्हेंबर रोजी बंगळुरू व अयोध्या येथेदेखील हुंकार सभा होणार आहे. क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात दुपारी ३ वाजता ही सभा होईल. या सभेला ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती, साध्वी ऋतुंभरा, देवनाथ पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, विहिपचे कार्याध्यक्ष आलोककुमार प्रामुख्याने उपस्थित राहतील. या सभेला विदर्भ व मध्य भारतातून एक लाख कार्यकर्ते येतील, असा विश्वास यावेळी सनतकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला.
अध्यादेश आणा
प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आतापर्यंत हिंदू समाजाने संयम ठेवला होता. केंद्राने अध्यादेश पारित करून सोमनाथाच्या धर्तीवर राम मंदिर उभारावे. या संदर्भात विहिपच्या राष्ट्रीय नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्याचे संजय भेंडे यांनी सांगितले.