‘रयत’च्या अध्यक्षपदाचा पवारांचा ‘रौप्यमहोत्सव’ बिनविरोध निवड : सचिवपदी गणेश ठाकूर
By admin | Published: May 9, 2014 11:45 PM2014-05-09T23:45:05+5:302014-05-10T01:42:37+5:30
आशिया खंडातील नामांकित शिक्षण संस्था असणार्या ‘रयत’मध्ये सबकुछ शरद पवार असल्याचे आज (शुक्रवार) पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
सातारा : आशिया खंडातील नामांकित शिक्षण संस्था असणार्या ‘रयत’मध्ये सबकुछ शरद पवार असल्याचे आज (शुक्रवार) पुन्हा एकदा स्पष्ट झाले. संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा त्यांची बिनविरोध निवड झाली. १९८९ पासून ‘रयत’च्या अध्यक्षपदी पवार आहेत. आज झालेली त्यांची निवड ९ मे २०१७ पर्यंत आहे. त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतली आणि अध्यक्षपदावरील त्यांची आज २५ वर्षे पूर्ण झाली. दरम्यान, सचिवपदी डॉ. गणेश ठाकूर, तर माध्यमिकच्या सहसचिवपदी उत्तमराव आवारी आणि उच्च माध्यमिक सहसचिवपदी डी. डी. पाटील यांची निवड झाली. ‘रयत’चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या मुख्य कार्यक्रमानंतर मुख्य कार्यालयात संस्थेची सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी या निवडी करण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवाजी विद्यापीठाचे विष्णू खाडे आणि शामसुंदर गोखले यांनी काम पाहिले. ‘रयत’च्या कार्यकारिणीत पाच उपाध्यक्ष, सचिव आणि २४ व्यवस्थापन परिषद सदस्यांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदी जयश्री चौगुले, एस. एम. पाटील, शिवाजीराव पाटील, दादासाहेब कळमकर, गोपी किसन पाटील यांची निवड झाली. व्यवस्थापन परिषदेत अॅड. रावसाहेब शिंदे, डॉ. अनिल पाटील, डॉ. एन. डी. पाटील, शंकरराव कोल्हे, डॉ. पतंगराव कदम, उपमुख्यमंत्री अजित पवार, आबासाहेब देशमुख, रामशेठ ठाकूर, आमदार गणपतराव देशमुख, विजय कोलते, अॅड. भगीरथ शिंदे, अशोकराव काळे, अॅड. रवींद्र पवार, रामचंद्र गायकवाड, कृष्णराव घाटगे तर ‘लाईफ मेबंर्स’मधून प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव, प्राचार्य दिलीप कदम, प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, किसन रत्नपारखी, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर आणि ‘लाईफ वर्कर्स’तर्फे डॉ. पंजाबराव रोंगे, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांचा समावेश करण्यात आला. या निवडी तीन वर्षांसाठी आहेत. (प्रतिनिधी)