राज यांची पुन्हा शून्यातून सुरुवात

By Admin | Published: January 20, 2017 04:03 AM2017-01-20T04:03:20+5:302017-01-20T04:03:20+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे २० आणि २५ जानेवारीला ठाण्यात येत आहेत

Raj again starts from zero | राज यांची पुन्हा शून्यातून सुरुवात

राज यांची पुन्हा शून्यातून सुरुवात

googlenewsNext


ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे २० आणि २५ जानेवारीला ठाण्यात येत असून सदैव शिवसेनेला साथ देणाऱ्या या शहरात त्यांना पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. ठाण्यावर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. केंद्र व राज्यात भाजपाप्रणीत सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाल्यापासून मनसेलाच गळती लागली. या पक्षातील अनेकांनी शिवसेनेत उड्या घेतल्या. त्यामुळे आता या पक्षाचा ठाण्यात एकही नगरसेवक नाही. अनेक युवकांनी मनसेची कास सोडल्याने पक्ष कमकुवत झाला आहे. २००७ साली ठाण्यात मनसेचे तीन नगरसेवक निवडून आले आणि २०१२ च्या निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले होते. अल्पावधीत मनसेच्या काही नेत्यांच्या डोक्यात हवा गेली. वरिष्ठांचेही पक्षाकडे दुर्लक्ष होऊ लागले. कमकुवत नेतृत्व, जनमानसात मनसैनिकांचा कमी वावर, वारंवारची आंदोलने आणि त्या आंदोलनातून समस्येचे निराकरण नाही या व अशा विविध कारणामुळे मनसेची प्रतिमा खालावली. २०१७च्या महापालिका निवडणुकीत मनसेला याची किंमत मोजावी लागणार, असा साऱ्यांचा होरा आहे.
या पार्श्वभूमीवर राज यांच्याकरिता दोन आशास्थाने आहेत. त्यापैकी एक म्हणजे अनेक समस्यांनी ग्रस्त अशा दिव्यातील ११ वॉर्डावर ते लक्ष केंद्रीत करून तेथे नव्याने पाय रोवू शकतात. तसेच विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही ठाणे शहरात प्रत्येक महापालिका वॉर्डात मनसेला पडलेल्या एक हजार ते पंधराशे मतदारांपर्यंत जाऊन ते त्यांना आपल्यासोबत राखण्याकरिता प्रयत्न करु शकतात. सध्या मनसेतर्फे मतदारांना नाशिकची यात्रा घडवण्यामागे मनसेबरोबर राहिलेल्या याच मतदारांना तेथे नेले जात आहेत. राज यांच्याबाबत आकर्षण असलेल्या युवकांना हेरून त्यांच्यामार्फत सोशल मीडियाद्वारे मनसे नाशिकचा प्रचार करणार आहे. (प्रतिनिधी)
अमित ठाकरेही करणार शक्तिप्रदर्शन
राज ठाकरे यांचे पुत्र राजकारणात सक्रीय होत असून यंदाच्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ते स्वत: शक्तिप्रदर्शन करणार आहेत. सध्या सोशल मीडियावर ते लक्ष ठेवून आहेत, असे सांगण्यात येते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ठाण्यात आगमन होत असून या आगमनाच्या वेळी जोरदार शक्ति प्रदर्शनाचे नियोजन केले आहे.तब्बल ६०० दुचाकी आणि शंभराच्या आसपास चारचाकी वाहनांच्या भव्य रॅलीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शुक्र वारी सायंकाळी ५.३० वाजता चेकनाका येथे त्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतरकोपरी, कळवा, ठाणे मार्केट, आकाशगंगा, वृंदावन, श्रीरंग सोसायटी आणि वागळे इस्टेट या परिसरातील मनसेच्या निवडणुक कार्यालयांचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते सीकेपी महोत्सवालाही भेट देणार आहेत.
>ठाकरे यांच्या हस्ते १६ कार्यालयांचे उद्घाटन
दि. २० जानेवारी रोजी राज यांच्या हस्ते १६ कार्यालयांचे उदघाटन होणार आहे तर २५ जानेवारी रोजी निवडणूक कार्यालयाच्या उदघाटनासाठी ते ठाण्यात येत आहेत. यावेळी राज भाजपाला टार्गेट करतात की सत्ताधारी शिवसेनेला की दोघांना याबाबत औत्सुक्य आहे.
>प्रभागस्तरीय सभांसाठी
मनसे शहराध्यक्ष आग्रही
ठाण्यात मनसेचा प्रभाव कमी झाल्याने ठाकरे यांच्या मोठ्या सभा घेण्याऐवजी छोट्या सभांवर ठाणे मनसेचा जोर असणार आहे. ठाकरे यांच्या चार सभा व्हाव्यात याकरिता आम्ही आग्रही आहोत. या सभा प्रामुख्याने घोडबंदर रोड, अष्टविनायक चौक, दिवा, वृंदावन या ठिकाणा घेण्यात येतील, असे मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.

Web Title: Raj again starts from zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.