राज-भुजबळ भेटीने तर्कवितर्कांना उधाण

By admin | Published: December 7, 2015 02:18 AM2015-12-07T02:18:18+5:302015-12-07T02:18:18+5:30

महाराष्ट्र सदन घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले.

RAJ-Bhujbal visits give rise to logic | राज-भुजबळ भेटीने तर्कवितर्कांना उधाण

राज-भुजबळ भेटीने तर्कवितर्कांना उधाण

Next

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र, आपली ही भेट कौटुंबिक असल्याचे सांगत त्यांनी चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास राज यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भुजबळांचे आगमन झाले. उभयतांमध्ये सुमारे दोन-अडीच तास चर्चा झाली. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या अचानक झालेल्या या भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र, ही भेट कौटुंबिक असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. या भेटीमागे कोणताच राजकीय हेतू नव्हता. ही भेट कौटुंबिक स्वरूपाची होती. राज यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे या घसरून पडल्याने सध्या आजारी आहेत. कुंदाताई आणि माझी पत्नी जुन्या मैत्रिणी आहेत. मी आजच हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला रवाना होत आहे. त्यामुळे पुढे अनेक दिवस या जुन्या मैत्रिणींची भेट शक्य झाली नसती. म्हणून पत्नीच्या आग्रहावरून राज यांच्या मातोश्रींची विचारपूस करण्यासाठी कृष्णकुंजवर आलो, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
या वेळी राज यांच्यासोबतही चर्चा झाली. मात्र त्यात राजकारण नव्हते, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांची गर्दी राज यांनी आपल्याला त्यांच्या घरातून दाखविली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर मोठा काळ लोटला असताना आजही लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर येत असतात, यात त्या महामानवाचे कार्य अधोरेखित होते असे राज ठाकरे यावेळी म्हणाल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सदन आणि कलिना भूखंड घोटाळा प्रकरणी भुजबळांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ-राज यांच्या भेटीला राजकीय किनार असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: RAJ-Bhujbal visits give rise to logic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.