राज कुंद्रांनी दिली भरकोर्टात तक्रारदारास धमकी

By admin | Published: May 19, 2017 08:46 PM2017-05-19T20:46:43+5:302017-05-19T20:46:43+5:30

अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी आपणास धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केल्यामुळे खळबळ उडाली

Raj Kundra threatens complainant in Bharuch | राज कुंद्रांनी दिली भरकोर्टात तक्रारदारास धमकी

राज कुंद्रांनी दिली भरकोर्टात तक्रारदारास धमकी

Next

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 19 - भिवंडीमध्ये दाखल झालेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणात ठाणे न्यायालयात शुक्रवारी सुनावणी सुरू असताना, अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी आपणास धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केल्यामुळे खळबळ उडाली. या प्रकाराबद्दल कुंद्रा यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने न्यायालयाची माफी मागितली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा यांच्यासह बेस्ट डिल टीव्ही या होम शॉपिंग कंपनीच्या पाच संचालकांविरूद्ध भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी गत महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गोरेगाव येथील रवी भलोटिया यांचा भिवंडी येथे निर्यात व्यवसाय आहे. 2015 साली भलोटिया एक्सपोर्टसोबत बेस्ट डिल टीव्ही कंपनीने करार केला होता. त्यानुसार भलोटिया एक्सपोर्टने घाऊक दरात कंपनीला बेडशीटस्चा पुरवठा केला. या बेडशीटस्ची विक्री करून ग्राहकांकडून जस-जसा पैसा येईल, त्याप्रमाणे भलोटिया एक्सपोर्टला मोबदला देण्याचे करारनाम्यामध्ये नमुद होते. भिवंडी एमआयडीसीमध्ये भलोटिया एक्सपोर्टकडून बेडशीटस् आणि उशांच्या कव्हरचे उत्पादन केले जाते. दरम्यानच्या काळात बेस्ट डिल टीव्हीकडून मालाच्या मोबदला मिळत नसल्याने भलोटिया एक्सपोर्टने पुरवठा थांबवला होता. परंतु थकीत रक्कम लवकर देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर भलोटिया एक्सपोर्टने जुलै 2016 मध्ये कंपनीसोबत नवा करारनामा केला. मात्र त्यानंतरही थकीत रक्कम न मिळाल्याने आॅगस्ट 2016 मध्ये भलोटिया एक्सपोर्टने मालाचा पुरवठा पुन्हा थांबवला. रवी भलोटिया यांनी याप्रकरणी कोनगाव पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार बेस्ट डिल टीव्हीच्या माजी संचालक शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, दर्शित शाह, वेदांत बाली आणि उदय कोठारी यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना अंतरिम जामीन दिला होता. या जामिनावर शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश संगीता खलिपे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरु झाली. तब्बल अडीच तास सुनावणी चालली. संचालकांच्या वतीने अ‍ॅड. अनिकेत उज्वल निकम यांनी तर सरकारच्या वतीने अ‍ॅड. कुळकर्णी आणि अ‍ॅड. विशाल भानुशाली यांनी बाजु मांडली. सुनावणी आटोपल्यानंतर राज कुंद्रा यांनी आपणास 100 कोटी रुपये तयार ठेवण्याची धमकी दिल्याचा आरोप रवी भलोटिया यांनी केल्याने खळबळ उडाली. न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोपींच्या वकिलास पुन्हा पाचारण केले. अ‍ॅड. निकम यांनी त्यांच्या अशिलाच्या वतीने न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. राज कुंद्रा यांनी भलोटिया यांच्यावर 100 कोटी रुपयांचा बदनामीचा दावा केला आहे. त्याविषयीची नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. यासंदर्भातच ते भलोटिया यांच्याशी बोलत होते. कदाचित त्यांचा काही गैरसमज झाला असावा, असे अ‍ॅड. निकम यांनी न्यायालयास सांगितले. परंतु भर न्यायालयात अशा प्रकारे तक्रारदारास धमकावणे योग्य नसल्याचे सांगत, न्या. संगिता खलिपे यांनी या प्रकरणातील तक्रारदार किंवा साक्षीदारांसोबत भविष्यात अशी कृती करणार नसल्याचे लेखी न्यायालयास देण्याचे अ‍ॅड. निकम यांना सांगितले. शनिवारी न्यायालयास तशी हमी लेखी स्वरूपात दिली जाईल, असे अ‍ॅड. निकम यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, रवी भालोटिया यांनी त्यांना मिळालेल्या धमकीबाबत राज कुंद्रा यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार शुक्रवारी सायंकाळी नोंदवली.
-------------------------
शिल्पा शेट्टीच्या जामिनावर शनिवारी सुनावणी
शुक्रवारी दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी सुरु झालेली सुनावणी 5.30 वाजताच्या सुमारास आटोपली. तब्बल अडिच तास शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि कंपनीचे अन्य संचालक न्यायालयात होते. यावेळी त्यांचे वकिल अनिकेत निकम यांच्यासह सरकारी वकिल अ‍ॅड. कुळकर्णी आणि अ‍ॅड. विशाल भानुशाली यांनी आप-आपली बाजू प्रभावीपणे मांडली. आरोपींनी तक्रारदारास जवळपास एक कोटी रुपये दिले आहेत. वाद केवळ 24 लाखांचा आहे. आरोपींची सामाजिक प्रतिष्ठा विचारात घेण्याचे आवाहन न्यायालयास करीत, त्यांनी पोलीस कोठडीस विरोध केला. अ‍ॅड. भानुशाली यांनी त्यांच्या युक्तिवादास जोरदार प्रत्युत्तर दिले. आरोपींनी तक्रारदारास एक कोटी रुपये दिले, तो त्यांच्या मालाचा मोबदला होता. हे प्रकरण केवळ हिमनगाचे टोक असून, कंपनीविरोधात आणखी काही तक्रारीही दाखल असल्याचे त्यांनी न्यायालयास सांगितले. तक्रारदाराचा पैसा वसूल करण्यासाठी आणि या प्रकरणात आरोपींचे आणखी कुणी साथीदार आहेत का, हे तपासण्यासाठी त्यांनी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद आता आटोपले असून, आरोपींच्या अंतरिम जामिनावर न्यायालय शनिवारी निकाल देण्याची शक्यता आहे.

Web Title: Raj Kundra threatens complainant in Bharuch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.