राज यांना आता आर्थिक निकष का आठवला?
By Admin | Published: October 4, 2016 05:09 AM2016-10-04T05:09:12+5:302016-10-04T05:09:12+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची भूमिका सातत्याने मांडली, पण त्यांनी इतरांच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नव्हता
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची भूमिका सातत्याने मांडली, पण त्यांनी इतरांच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नव्हता. मात्र, शिवसेनेच्या मुखपत्रात छापून आलेल्या व्यंगचित्राबद्दल एक शब्द न उच्चारणाऱ्या राज ठाकरे यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची वेळ आली की आर्थिक निकषाचा मुद्दा का आठवला, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेच्या मुखपत्रातील आक्षेपार्ह व्यंगचित्राबद्दल खा. संजय राऊत यांनी आधीच माफी मागितली असती, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माफी मागण्याची वेळच आली नसती. पण कदाचित राऊत हे उद्धव यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असावेत, असा चिमटाही राणे यांनी काढला.
राणे म्हणाले, आजच्या काळात आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची भूमिका घेताना कोणाचेही एक टक्का तरी आरक्षण काढणे शक्य आहे का? ते कोणीही करून पाहावे, मग काय घडू शकते ते त्यांना कळेल. आम्ही सरकारमध्ये असताना तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात आरक्षणाची भूमिका मांडली होती. राज्यघटनेच्या कलम १५ (४) व कलम १६ (४)नुसार आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते, पण ते कोर्टात टिकले नाही. कारण आम्ही १८ लाख लोकांशी संवाद साधून तयार केलेला अहवाल न्यायालयाने पाहिला नाही, असेही ते म्हणाले. व्यंगचित्रामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली. माफी मागितली नाही, तर पक्ष टिकेल की नाही अशी त्यांना भीती होती. आरक्षणाबाबत कोर्टात कोणते मुद्दे मांडायचे याविषयी भाजपा-शिवसेनेचे एकमत होत नाही, असा आरोपही राणे यांनी केला.