“हिंदी राष्ट्रभाषा नाही, महाराष्ट्रात पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा”: राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 01:35 PM2024-01-28T13:35:25+5:302024-01-28T13:35:33+5:30

Raj Thackeray News: पंतप्रधानांना स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नसेल, तर तुम्ही-आम्ही का लपवतो, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली.

raj thackeray addressed marathi vishwa marathi sammelan held at navi mumbai | “हिंदी राष्ट्रभाषा नाही, महाराष्ट्रात पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा”: राज ठाकरे

“हिंदी राष्ट्रभाषा नाही, महाराष्ट्रात पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा”: राज ठाकरे

Raj Thackeray News: मी कडवट मराठी आहे. माझ्यावर संस्कारच तसे झाले आहेत. आपण आधी महाराष्ट्रात लक्ष देणे गरजेचे आहे. जगभरात मराठी माणूस गेला आहे. त्याबद्दल अभिनंदनच आहे. पण महाराष्ट्रातील शहरांमध्ये मराठी सोडून जेव्हा हिंदी माझ्या कानावर येते, तेव्हा त्रास व्हायला लागतो. राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करायला हवी, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. विश्व मराठी संमेलनाला राज ठाकरे यांची विशेष हजेरी लाभली. यावेळी ते बोलत होते. 

भाषेला विरोध नाही. पण हिंदी काही राष्ट्रभाषा नाही. जशा इतर भाषा आहेत, तशीच हिंदी एक भाषा आहे. देशात राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही. आमच्यावर हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले. बोलण्यात आपण मराठी लोक हिंदी का वापरतो? इतकी उत्तम मराठी भाषा आहे. मराठी भाषेत जो विनोद होतो, तो दुसऱ्या कुठल्या भाषेत होत असेल असे मला वाटत नाही. पण आज ही भाषा बाजूला सारण्याचा राजकीय प्रयत्न होतोय. ते पाहून माझी तळपायाची आग मस्तकात जाते, या शब्दांत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

मराठी भाषा सर्वांत उत्तम आणि समृद्ध भाषा

मराठी भाषा सर्वात उत्तम आहे. समृद्ध भाषा आहे. तुम्हाला जी भाषा शिकायची ती शिका, पण जिथे राहताय ती भाषा प्रथम शिका. त्यात कसला कमीपणा आला. मराठीबद्दल बोलले की तुम्ही म्हणणार हे संकुचित आहेत. या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या भाषेबद्दल, त्यांच्या राज्याबद्दल वाटते, जगातील सर्वांत मोठा पुतळा त्यांना गुजरातमध्ये बांधावासा वाटतो, गिफ्ट सिटी पंतप्रधानांना गुजरातमध्ये बांधावी वाटत असेल, हिऱ्यांचा व्यापार त्यांना गुजरातमध्ये न्यावासा वाटतो, जर पंतप्रधानांना स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नसेल, तर तुम्ही-आम्ही का लपवतो, अशी विचारणा करत, काही जण म्हणतील पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत आहे. परंतु ही टीका नाही. त्यांच्यासारखे प्रेम आपण आपल्या राज्याबद्दल दाखवले पाहिजे. आपण आधी महाराष्ट्राकडे लक्ष दिले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी नमूद केले. 

दरम्यान, जैन सोसायटीतला एखादा माणूस मराठी माणसाला घर देणार नाही असे सांगतो, तेव्हा आम्ही काय करायचे, हे असे तामिळनाडूत, पश्चिम बंगालमध्ये, गुजरातमध्ये, आसाममध्ये, आंध्र प्रदेशात, केरळमध्ये करून दाखवा. हे महाराष्ट्रात का होते, याचे कारण आमचे बोटचेपे धोरण. आम्हीच मागे राहतो. सगळी राज्ये आपापली भाषा जपतात, मग आम्हीच का सारखे घरंगळत दुसऱ्या भाषेत सारखे जातो, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
 

Web Title: raj thackeray addressed marathi vishwa marathi sammelan held at navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.