आरक्षणाच्या वादात पडू नका, लोकसभेच्या तयारीला लागा; राज ठाकरेंचे मनसे नेत्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 03:12 PM2023-11-22T15:12:23+5:302023-11-22T15:14:45+5:30
शिवतीर्थवर झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी येत्या काही दिवसांत आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करू असं सांगितले.
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठक घेतली.या बैठकीत राज्यातील सध्याच्या घडामोडींवर आणि येणाऱ्या निवडणुकींवर चर्चा करण्यात आली. त्यात सध्या राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू आहे त्यावरही बैठकीत चर्चा झाली. तेव्हा आरक्षणाच्या वादात पक्षाच्या नेत्यांनी पडू नये अशी सूचना राज ठाकरेंनी सर्वांना दिली.
शिवतीर्थवर झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी येत्या काही दिवसांत आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करू असं सांगितले. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असंही राज यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. मनसे नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आरक्षण, निवडणूक यासारख्या इतर विषयांवरही बैठकीत सल्लामसलत करण्यात आली. लोकसभेसह इतर निवडणुका आहेत, त्यासाठी कामाला लागा असं राज यांनी म्हटलं. त्याचसोबत २५ नोव्हेंबरपर्यंत सुप्रीम कोर्टाने मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना मुदत दिली आहे. ज्या दुकानदारांनी अद्याप पाट्या बदलल्या नसतील अशांना आठवण करून द्या असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना म्हटलं.
राज ठाकरेंनी मनोज जरांगेच्या आंदोलनावर व्यक्त केली होती शंका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर शंका उपस्थित केली होती. राज ठाकरे म्हणाले होते की, मी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना भेटलो होतो, तेव्हा अशाप्रकारे आरक्षण मिळणार नाही असं मी बोललो होतो. परंतु आता जरांगे पाटील आहेत की त्यांच्यामागे कोण आहे? त्यातून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करायचं असं आहे का? कारण निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी होतायेत. हे इतके सरळ चित्र दिसत नाही. त्यामुळे कालांतराने यामागे कोण आहे हे कळेलच असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय असे अनेक गोष्टी पुढे येतात, ज्यामुळे लोक ज्याने त्रस्त आहेत हे त्यांच्या डोक्यात येताच कामा नये. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीही मुद्दे काढले जातात असंही राज ठाकरेंनी म्हटलं होतं.