Raj Thackeray: राजसाहेब, माझं काय चुकलं?; पुण्यानंतर आता औरंगाबादमध्येही मनसेत नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 12:02 PM2021-12-16T12:02:06+5:302021-12-16T12:04:37+5:30
२ वर्षापूर्वीच सुहास दाशरथे यांनी शिवसेनेतून मनसेत प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर दाशरथे यांना जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
औरंगाबाद – पुण्यात रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर औरंगाबादमध्येही मनसेतील नाराजी उफाळून आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर जिल्ह्याच्या कार्यकारणीत फेरबदल करण्यात आले. यात मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांचा तडकाफडकी पदावरुन बाजूला करत पुन्हा ही जबाबदारी सुमित खांबेकर यांच्याकडे देण्यात आली. मात्र हा निर्णय का घेतला? याची कल्पनाही दाशरथे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना नव्हती.
२ वर्षापूर्वीच सुहास दाशरथे यांनी शिवसेनेतून मनसेत प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर दाशरथे यांना जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. औरंगाबादच्या विविध आंदोलनात सुहास दाशरथे प्रखरतेने पुढे दिसले. राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येणार म्हणून सुहास दाशरथे यांनी स्वागताची जय्यत तयारी केली. परंतु या दौऱ्यातच त्यांच्याकडून जिल्हा अध्यक्ष पद काढून घेण्यात आले. त्यामुळे दाशरथे नाराज झाले.
सुहास दाशरथे म्हणाले की, मला पदावरुन बाजूला केले आहे. मी महाराष्ट्र सैनिक म्हणूनच काम करेन. परंतु साहेब माझं चुकलं काय? मी काम करतोय. पक्ष संघटनेची बांधणी करतोय. मग माझं चुकलं कुठे हा प्रश्न माझ्या मनाला पडलाय. परंतु साहेबांनी जी जबाबदारी सोपवली ती निष्ठेने पार पाडण्यास मी तयार आहे. मी पुन्हा महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करायला तयार आहे. फक्त हे का घडलं याचं स्पष्टीकरण हवं आहे असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत माझ्याकडे फक्त निष्ठा आणि स्वाभिमान या दोष्टी आहेत. शिवसेनेतही त्याच निष्ठेने आणि स्वाभिमानानं काम केले. यापुढेही राजसाहेब जो निर्णय घेतील त्याच आधारे काम करणार आहे असं सुहास दाशरथे यांनी सांगितले.
२२ महिन्यानंतर औरंगाबादेत आले अन्...
तब्बल २२ महिन्यांनंतर औरंगाबादेत आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या धक्कातंत्राचा प्रयोग करत पक्षाची जिल्हा कार्यकारिणीच तडकाफडकी बदलून टाकली. ज्यांनी पक्षप्रमुखांच्या दौऱ्याचे नियोजन केले, त्या सुहास दाशरथे यांचीच जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्याने मनसेचे कार्यकर्ते अचंबित झाले. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतून आलेल्या दाशरथे यांची उचलबांगडी करून खामनदी प्रकरणानंतर बाजूला केलेले सुमित खांबेकर यांना पुन्हा शहरी राजकारणात सक्रिय केले. आता मनसेचे तीन जिल्हाप्रमुख असतील. आगामी जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीच्या निवडणुका लढण्याचा एल्गार करीत ठाकरे यांनी यापुढे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जशास तसे उत्तर देण्याची तयारी ठेवण्याचे आदेश विभागीय मेळाव्यात दिले.