ही तर 'भाऊबंध'की; उद्धव ठाकरेंची भूमिका राज ठाकरेंना आधीच कळते तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 07:04 PM2018-07-19T19:04:08+5:302018-07-19T19:09:15+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधला. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात काय सुरू आहे, हे मला ठाऊक आहे. शिवसेनेकडून भाजपाला कितीही विरोध केला तरी ते सत्तेतून बाहेर पडणार नाही. स्वत:च्या तुंबडया भरत राहणार, असा आरोप राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केला.औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
शिवसेना सातत्याने भाजपाला विरोध करत आहे. आम्ही भाजपासोबत यापुढे निवडणूक लढवणार नाही, नाणार प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात येत आहे. मात्र, लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा आणि मतदान होणार आहे. त्यावेळी शिवसेना काय भूमिका घेते ते आपल्याला पाहायचे आहे. शिवसेनेने कितीही भाजपाला विरोध करत असल्याचे भासवले तरी ते घरंगळत त्यांच्यासोबतच जाणार आहेत, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चांना उत आला होता. मात्र, अविश्वास प्रस्तावादरम्यान मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून, सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी उपस्थित राहण्याचा व्हीप आपल्या खासदारांना बजावला आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावापूर्वीच मोदी सरकारचे पारडे जड झाले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना भाजपालाच साथ देणार हे उघड झाले आणि सगळीकडे राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातले ओळखल्याची चर्चा सुरु झाली.