पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 08:37 AM2024-05-04T08:37:05+5:302024-05-04T08:37:24+5:30
loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलासपणे भाष्य केले. त्याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
मुंबई - Raj Thackeray on Balasaheb Thackeray ( Marathi News ) माझा हेतू कधीही पक्षाचा प्रमुख व्हावं, पक्ष ताब्यात घ्यावा असं नव्हते. मला पक्ष फोडून काय करायचं नव्हते. मला बाळासाहेब आणि त्यांच्या पक्षाला कधीही दगाफटका करायचा नव्हता. मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. बाळासाहेबांनी माझ्यावर वाट्टेल त्या थराला जाऊन टीका केली तरी मी त्यावर भाष्य करणार नाही हे मी जाहीर केले होते असं सांगत राज ठाकरेंनीबाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
बाळासाहेबांना राज ठाकरेंचं कुठलं भाषण आवडलं यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी १९९१ साली एक भाषण केले होते, फी वाढीविरोधात मोर्चा काढला होता. तो मोर्चा संपल्यानंतर माझं भाषण ऐकायला स्व.माँसाहेब मीनाताई आल्या होत्या. मला गाडीत बसवलं आणि घरी गेलो, घरी गेल्यानंतर काकांसमोर मला बसवलं. बाळासाहेब म्हणाले, मी तुझं भाषण ऐकलं, मी विचार केला त्यांनी कसं ऐकलं, तेव्हा फोन, टीव्ही वैगेरे नव्हते. तर त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीने पानटपरीवरून फोन लावून साहेबांना ते भाषण स्पीकरवर ऐकवलं होते. मला बाळासाहेबांनी सांगितले, बस्स, माझ्या बापानं जे मला सांगितले ते मी तुला सांगतो, आपण कसं बोललो, त्यापेक्षा आपण काय बोललो, जाताना लोक काय घेऊन गेले याचा विचार कर, आपण किती शहाणे आहोत यापेक्षा लोक किती शहाणे होतील, कसे होतील हा विचार करून भाषण कर, ज्या मैदानात जातील त्या मैदानाची भाषा बोल. अशा ३-४ गोष्टी बाळासाहेबांनी सांगितल्या. बोल भिडू या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
वारसा हा विचारांचा, संपत्तीचा नव्हे
वारसा म्हणजे संपत्ती असं अनेकांना वाटते, परंतु तसे नव्हे, हे संस्कार, गुण, कला, विचार हाच वारसा असतो. वारसा हक्क हा अनेकजण संपत्तीच्या दृष्टीने विचार करतात. पण ती गोष्ट वारसा होत नाही. विचारांचा वारसा सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो वाचणं, ऐकणं इतके नव्हे तर तो विचार मांडणे, अंमलात आणणे हा वारसा आहे असं राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
शिवसेनेत माझी भूमिका काय हा प्रश्न होता
मला पक्षाचं नेतृत्व करायचंय, बाळासाहेबांच्या पक्षाचं प्रमुख व्हावं हे माझ्या मनाला कधीही शिवलं नाही. मला फक्त इतकेच विचारायचं होतं, माझी जबाबदारी सांगा, प्रचाराला बाहेर काढणार असाल आणि इतर वेळी काही देत नसाल, तर मला हे मान्य नव्हते. मी उद्या एका ठिकाणी प्रचार केला, तिथे काही आश्वासक बोललो, बाळासाहेबांच्या कृपेने तिथे उमेदवार निवडून आला, उद्या जे मी बोललो ते निवडून आलेल्या व्यक्तीने केले नाही. तर उद्या लोक मला विचारणार नाहीत का? मी कशातही सहभागी नाही, फक्त प्रचार करायचा हे मला मान्य नव्हते असंही राज ठाकरेंनी सांगितले.
रेल्वे इंजिन कोर्टातून मिळालं नाही
१८ वर्ष माझ्या पक्षातील लोकांनी काम करून रेल्वे इंजिन हे कमावलेले चिन्ह आहे. सहज गमंत म्हणून किंवा कोर्टातून मिळालं नाही. लोकांनी मतदान करून त्या संख्येच्या आधारे चिन्ह मिळाले. ते असताना दुसऱ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे कसं शक्य आहे? राजकारणाच्या गोष्टीसाठी, सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकायचा हे माझ्याकडून शक्य नाही असं सांगत राज यांनी एका खासदारकीसाठी दुसऱ्याच्या चिन्हावर लढण्यास नकार दिल्याचं सांगितले.
दरम्यान, १९९५ साली शिवसेनेत असताना प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि आम्ही होतो, २६ वर्षाचा मी होतो, गेल्या १८ वर्षात पुन्हा जागावाटपाची वेळ आली नाही. पक्षाचे उमेदवार जाहीर केले. जागावाटपाची वेळ आली तर माझ्या पक्षातील लोक जातील. आम्ही महाराष्ट्राचं व्हिजन म्हणून ब्ल्यू प्रिंट आणली. राज्यातील जनतेनं सर्वांना संधी दिली, एकदा मला देऊन बघा, नालायक ठरलो तर पुन्हा समोर येणार नाही असं आवाहनही राज ठाकरेंनी केले.