पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 08:48 IST2025-04-23T08:11:28+5:302025-04-23T08:48:58+5:30

Pahalgam Terror Attack: ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

Raj Thackeray angry over Pahalgam Terror Attack, told the Center, "The next 10 generations of terrorists will tremble...", | पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   

पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारनंतर दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात २६ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातीलही काही पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान या दहतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून, दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तीव्र निषेध केला असून,  केंद्र सरकारने या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा, असा या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करावा, असं आवाहन केलं आहे. 

यासंदर्भात सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले की,   जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा.

राज ठाकरे या पोस्टमध्ये पुढे लिहितात की, १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत. केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पावलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्यांना कायमच संपवेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. 

या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली. एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं, की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला. ही तुमची मुजोरी? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ. या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. 

त्यांनी या पोस्टमध्ये पुढे कलम ३७० हटवल्यानंतर कमी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख करत लिहिले की, केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी. हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही आहे. तसेच त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल, असं आश्वासनही राज ठाकरे यांनी दिलं. 

Web Title: Raj Thackeray angry over Pahalgam Terror Attack, told the Center, "The next 10 generations of terrorists will tremble...",

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.