युतीसाठी राज ठाकरे आतुर
By Admin | Published: January 11, 2017 05:08 AM2017-01-11T05:08:51+5:302017-01-11T05:08:51+5:30
आतापर्यंत ‘एकला चलो रे’चा नारा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘युतीचा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू,’ असे सांगत मंगळवारी खळबळ उडवून दिली.
मुंबई : आतापर्यंत ‘एकला चलो रे’चा नारा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘युतीचा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू,’ असे सांगत मंगळवारी खळबळ उडवून दिली. एकीकडे स्वबळाच्या नारेबाजीत शिवसेना-भाजपा युतीचे घोंगडे भिजत पडलेले असताना मनसेच्या हाकेला कोण साद घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पक्ष स्थापनेपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकला चलो रे ही भूमिका घेतली होती. विकासासाठी एकहाती सत्ता द्या, अशी साद ते मतदारांना घालत. यंदाच्या महापालिका निवडणुकांसाठी मात्र युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करू, असे सांगत राज यांनी युतीबाबत सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. युतीसाठी राज ठाकरे यांनी साद घातली असली तरी त्यांना कोण प्रतिसाद देणार, असा प्रश्न आहे. मात्र, स्वबळाच्या लाटेवर स्वार झालेल्या शिवसेना आणि भाजपाच्या गोटात राज यांच्या या नव्या खेळीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राज यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिलेल्या युतीच्या प्रस्तावामुळे मनसेचे इंजिन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतरच्या स्थानिक निवडणुकांमध्ये मनसेला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
राज ठाकरे यांची आक्रसलेली लोकप्रियता आणि पक्षाच्या भवितव्याबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना, भाजपाचा रस्ता धरला आहे. अशा वातावरणात शिवसेना अथवा भाजपाकडून खरोखरच मनसेला सोबत घेण्याबाबत गांभीर्याने विचार होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना-भाजपातील युतीची बोलणी फिसकटल्यानंतर उद्धव आणि राज यांच्या दरम्यान युतीबाबत चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट खुद्द राज यांनी केला होता. युतीच्या चर्चा सुरू झाल्याने फॉर्मवाटपही थांबविले होते. मात्र, शिवसेनेकडून नंतर कोणताच निरोप न आल्याने शेवटी मनसे उमेदवारांना फॉर्म वाटल्याचे राज यांनी सांगितले होेते. (प्रतिनिधी)
दुहेरी आकडा गाठणार का?
राज ठाकरे यांची आक्रसलेली लोकप्रियता आणि पक्षाच्या भवितव्याबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना, भाजपाचा रस्ता धरला आहे. गेल्या निवडणुकांत २८ नगरसेवक निवडून आणणाऱ्या इंजिनाला यंदा दुहेरी आकडा तरी गाठता येईल का, अशी शंका पक्षातूनच व्यक्त केली जात आहे.