AvinaSh Jadhav Ayodhya: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द, पण त्यांच्या पठ्ठ्याने तो पूर्ण केला; अविनाश जाधव अयोध्येत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2022 10:25 AM2022-06-05T10:25:22+5:302022-06-05T10:26:23+5:30
AvinaSh Jadhav Ayodhya Visit: आज म्हणजेच 5 जून रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. पण, भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याकडून होणारा विरोध आणि प्रकृतीच्या कारणास्तव दौरा रद्द करण्यात आला.
अयोध्या: आज म्हणजेच 5 जून रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. पण, भाजप खासदार बृजभूषण सिंह(Brij Bhushan Singh) यांच्याकडून राज ठाकरेंच्या दौऱ्याला कडाडून विरोध झाला. यातच, पायाच्या दुखण्याने डोकं वर काढले आणि डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितल्यामुळे दौरा रद्द करण्यात आला. राज ठाकरेंनी दौरा रद्द केला, पण त्यांच्या कट्टर मनसैनिकाने हा दौरा पूर्ण करुन दाखवला.
राज ठाकरेंच्या दौऱ्याला कडाडून विरोध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुरुवातीच्या काळात राज ठाकरेंनी मुंबईत राहणारे उत्तर भारतीय, विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांविरोधात तीव्र आंदोलने केली होती. अनेकदा मारहाणही करण्यात आली. त्यामुळे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली.
अविनाश जाधव अयोध्येत
हा विरोध आणि प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरेंनी अयोध्या दौरा पुढे ढकलला. मात्र, मनसेचे ठाण्यातील धडाडीचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत आल्यावर रविवारी त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले. अविनाश यांनी फेसबुक लाईव्ह करून ही माहिती दिली आहे.
'मराठी माणसाचा स्वाभिमान जपला'
फेसबूक लाइव्हदरम्यान अविनाश जाधव म्हणाले की, "आजची तारीख 5 जून, सन्माननीय राजसाहेब यांचा अयोध्या दौरा होता. काही कारणास्तव तो रद्द झाला. पण, त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी तो पूर्ण केला. मराठी माणसाचा स्वाभिमान जपला. आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. आम्ही ठरवल्यावर कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट पूर्ण करतोच. काही वेळापूर्वीच आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले. तसेच बृजभूषण सिंह यांचा कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणीही आम्ही गेलो होतो, असे अविनाश जाधव यांनी म्हटले."