'भारतरत्न'साठी लालकृष्ण अडवाणींचं राज ठाकरेंकडून अभिनंदन, पण भाजपाला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 02:09 PM2024-02-03T14:09:47+5:302024-02-03T14:16:03+5:30

देशातील राजकारणाला वळण देणाऱ्या ह्या ज्येष्ठ नेत्याचं ह्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन असंही राज ठाकरे यांनी म्हटलं

Raj Thackeray congratulates LK Advani for 'Bharat Ratna', but criticized BJP | 'भारतरत्न'साठी लालकृष्ण अडवाणींचं राज ठाकरेंकडून अभिनंदन, पण भाजपाला खोचक टोला

'भारतरत्न'साठी लालकृष्ण अडवाणींचं राज ठाकरेंकडून अभिनंदन, पण भाजपाला खोचक टोला

मुंबई - भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लालकृष्ण अडवाणींनाभारतरत्न दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत केंद्र सरकारचेही आभार मानलेत. परंतु अडवाणींना पुरस्कार याआधीच मिळायला हवा होता असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपाला खोचक टोला लगावला. 

राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं की, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक लालकृष्ण अडवाणी ह्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला ह्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. केंद्र सरकारचं देखील अभिनंदन, अर्थात गेली १० वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना, ज्यांच्यामुळे भाजपा आज ज्या स्थानावर आहे त्या व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान ह्या आधीच मिळायला हवा होता. अर्थात हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. असो असं त्यांनी म्हटलं. 

तसेच करोडो भारतीयांचं आणि अनेक पिढ्यांचं, राममंदिराचं स्वप्न पूर्ण झालं, त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच, आणि हे करताना त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली. राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केली. रथयात्रेतून अडवाणींनी देशातील हिंदूंची अस्मिता जागृत केली आणि भारतीय जनता पक्षाचा उदय झाला, पण हे करताना 'अब की बारी अटलबिहारी' म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा हा अडवाणींकडे होता. देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजपर्यंतच राजकारण पाहिलेले आणि देशातील राजकारणाला वळण देणाऱ्या ह्या ज्येष्ठ नेत्याचं ह्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन असंही राज ठाकरे यांनी म्हटलं. 

अतिशय योग्य निवड!
"भारतरत्न पुरस्कारासाठी कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी या दोन व्यक्तींची झालेली निवड अतिशय योग्य आहे. कर्पुरी ठाकूर यांनी समाजातील दुबळ्या वर्गासाठी काम केलं. १९७८ साली मी महाराष्ट्रचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा कर्पुरी ठाकूर हे बिहारचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये अनेकदा आमची चर्चा होत असत. अतिशय साधे आणि विनम्र, मात्र विचाराबाबत अत्यंत भक्कम असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. त्यामुळे त्यांची निवड ही योग्यच आहे. दुसरीकडे, लालकृष्ण अडवाणी हे अनेक वर्ष देशाच्या संसदेत होते. ते दिल्लीतून निवडूनही गेले होते. एखादा-दुसरा अपवाद सोडला तर त्यांचा कधी पराभव झाला नाही. सार्वजनिक जीवनात स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता," अशा शब्दांत शरद पवार यांनी लालकृष्ण अडवाणी यांचं कौतुक केलं आहे.

Web Title: Raj Thackeray congratulates LK Advani for 'Bharat Ratna', but criticized BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.