"मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अशी परिस्थिती असेल तर इतर ठिकाणी कल्पनाच करवत नाही’’, राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 02:17 PM2024-08-21T14:17:39+5:302024-08-21T14:18:16+5:30
Raj Thackeray criticizes CM Eknath Shinde: बदलापूरमधील घटनेवरून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
बदलापूरमधील एका प्रख्यात शाळेमध्ये ४ वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे सध्या देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या घटनेविरोधात काल बदलापूरमध्ये पालकांनी तीव्र रेल रोको आंदोलन केलं होतं. दरम्यान, बदलापूरमधील घटनेवरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
याबाबत सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात की, बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली. त्यावर मी काल पण म्हणालो, तसं यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली. विषय लावून धरला आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं. मुळात ठाणे हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
आज सरकार 'लाडकी बहीण' योजनेद्वारे स्वत:चं कौतुक करून घेण्यात मग्न आहे. पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं हे पहिलं कर्तव्य नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, अशी मागणीही राज ठाकरे यांनी यावेळी केली.