राज ठाकरे विधानसभेची रणनिती १३ मे रोजी ठरवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 06:34 AM2019-05-10T06:34:00+5:302019-05-10T06:34:14+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १३ मे रोजी ठाण्यात येत आहेत.
ठाणे - आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १३ मे रोजी ठाण्यात येत आहेत. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राज्यव्यापी मेळावा होणार असल्याची माहिती मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी लोकमतला दिली.
लोकसभा निवडणुकीच्या काळात राज यांनी महाराष्ट्रभर प्रचार सभा घेत ‘लाव रे तो व्हिडीओ’ लावून मोदी शहा मुक्तीचा नारा दिला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतींमध्ये विधानसभेबाबत भूमिका जाहीर केली नव्हती. परंतु, आता सोमवारी ठाण्यात मेळावा घेऊन ते विधानसभेच्या तयारीसंदर्भांत महाराष्ट्रातील तालुका, जिल्हा आणि शहर अध्यक्षांशी संवाद साधणार आहेत.
या निवडणुकीत कसे व काय काम करायला हवे याचे मार्गदर्शन करणार आहेत. २३ मे नंतर ते तीन महिने महाराष्ट्रभर दौरेही करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. ५०० प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यासाठी राज हे आदल्या दिवशीच म्हणजे रविवारी ठाण्यात मुक्काम करणार असून दुसºया दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. यामुळे या जाहीर मेळाव्यात राज ठाकरे कोणती रणनिती ठरविणार, त्यात काय मार्गदर्शन करणार, काँगे्रस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सहभागी होण्याबाबत काय भूमिका घेणार याविषयी मनसैनिकांत आतापासून चर्चेला उधाण आले आहे.