"स्वत:चा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलाय हे पहावत नसल्यानेच राज ठाकरेंचा थयथयाट"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 12:17 PM2022-05-03T12:17:04+5:302022-05-03T12:22:09+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर जोरदार टीका केली जात आहे.
रत्नागिरी-
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर जोरदार टीका केली जात आहे. यातच रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंबाबत मोठं विधान केलं आहे. स्वत:चा भाऊ मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीवर बसला आहे हे पहावत नसल्यानेच राज ठाकरेंचा थयथयाट सुरू आहे, अशी खोचक टीका विनायक राऊत यांनी केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
"स्वत:चा भाऊ मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीवर बसला आहे हे पहावत नसल्यानेच राज ठाकरेंचा थयथयाट सुरू आहे. केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांचा द्वेष राज ठाकरे यांच्या मनात भिनला आहे. राज ठाकरेंची करणमूक करण्याची पद्धत जुनी आहे. प्रत्येक निवडणुकीला सुपारी घ्यायचं काम ते करत असतात. भोंगा हा देशपातळीवरचा विषय असून याबाबत नियंत्रण आणायचं असेल तर केंद्रानं कायदा करावा", असं विनायक राऊत म्हणाले. तसंच भोंग्यांचा विषय घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठीच हा प्रश्न उचलला गेला असल्याचंही ते म्हणाले.
"भोंगा हा प्रश्न केवळ महाराष्ट्रातील नाही तर देशपातळीवरचा आहे. जर याबाबत निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकारने याबाबत कायदा करावा याची अंमलबजावणी देशभर केली जाईल. केवळ महाराष्ट्रात अतिक्रमण झालंय असं दाखवून महाविकास आघाडीला आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनाकारण त्रास देण्याचा प्रकार दुष्ट आणि कपट नितीनं भाजपाची सुपारी घेऊन राज ठाकरेंनी सुरू केला आहे", असं विनायक राऊत म्हणाले.