"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 08:55 PM2024-11-07T20:55:13+5:302024-11-07T20:55:39+5:30
Raj Thackeray : " जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा इतकीच इच्छा आहे."
Raj Thackeray : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसे जोरदार प्रचार करताना दिसत आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी तर प्रचारसभांचा धडाका लावला आहे. विविध ठिकाणी राज ठाकरेंच्या प्रचारसभा होत असून, ते महायुती आणि महिविकास आघाडीवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, आज राज ठाकरेंची घाटकोपरमध्ये सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी मनसेने आतापर्यंत केलेल्या सर्व आंदोलनाची आणि कामांची आठवण करुन दिली.
...तर तोंड दाखवणार नाही
राज ठाकरे म्हणाले की, "2006 साली घेतलेल्या पहिल्या सभेत सांगितले होते की, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे. तुमचा स्वाभिमानी कणा मतदानादिवशी जागृत राहायला पाहिजे. आतापर्यंत तुम्ही अनेकांना संधी देऊन बघितलीत. एकदा राज ठाकरेच्या हातात महाराष्ट्र देऊन बघा. नालायक ठरलो तर तोंड दाखवायला समोर येणार नाही आणि दुकान बंद करून टाकेन", असे कळवळीचे आवाहन राज ठाकरेंनी केले.
सत्ता नसताना अनेक कामे केली...
ते पुढे म्हणतात, "मनसैनिकांनी आतापर्यंत मेहनत घेऊन अनेक आंदोलने केली. सत्तेत नसतानादेखील आम्ही कामे केली. दुकानावरच्या पाट्यांसाठी आंदोलन केले, तेव्हा प्रत्येक पाट्यांवर मराठी नाव आले. मोबाईल फोनवर फक्त हिंदी आणि इंग्रजी येत होते, पण दणका दिल्यानंतर मराठी कानावर ऐकू यायला लागले, सत्तेत नसताना मनसेने रिझल्ट दिले आहे. मशिदीसमोरच्या भोंग्याचा त्रास अनेकांना होत होता, उद्धव ठाकरेंचे सरकार होते, तीन वेगवेगळ्या प्राण्यांचे सरकार होते. महाराष्ट्राभर आंदोलन केले, अनेकांनी स्वतहून बंद केले. माझ्या 17 हजार सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या. एका मुस्लीम पत्रकाराने सांगितले तुम्ही भोंगे बंद केले म्हणून माझा लहान मुलगा आज शांत झोपतोय. कोणत्याही धर्माचा दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्रास होता कामा नये."
युपी-बिहारच्या पोरांना नोकऱ्या मिळायच्या..
"उत्तरप्रदेश आणि बिहारमधून भरतीसाठी मुले महाराष्ट्रात यायची, त्यांना नोकऱ्या मिळायच्या. माझ्या राज्यातील मुलांना नोकऱ्या मिळवण्यासाठी आम्ही आंदोलन केले आणि आंदोलनानंतर आपल्या पोरांना नोकऱ्या मिळू लागल्या. इतर पक्षांना तुम्ही कधीच विचारले नाही. शेतकरी आत्महत्या करतात, महिला असुरक्षित आहेत, लहान मुलींवर बलात्कार सुरू आहेत, मनसेने हे प्रकरणं बाहेर काढल्यानंतर जगासमोर आली. कोणत्या वातावरणात जगताय तुम्ही. कसल्या निवडणुका घेऊन बसलोय आपण. नुसतं उन्हातान्हात उभे राहताय पदरी काही पडत नाहीये."
इकदा संधी देऊन बघा...
"माझी एवढीच विंनती आहे, संधी पुन्हा पुन्हा येत नसते. हा काय पिक्चर नाहीये. ही संधी गेली त्यानंतर पाच वर्षांनी संधी येईल. आयुष्यातील पाच पाच वर्ष निघून जाताय. ज्या प्रकारचा चिखल झालाय, असे वातावरण कधीच नव्हते. परत तेच लोकं आले तर त्यांचा असा समज होईल की, ते जे करताय ते बरोबर करताय. तुमच्या मतांचा अपमान झालाय त्याचा बदला घेण्याचीही संधी आहे. येत्या 20 तारखेला एकदा संधी द्या. महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडू शकतात. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा इतकीच इच्छा आहे," असे आवाहन राज ठाकरेंनी यावेळी केले.