मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 08:10 AM2024-11-29T08:10:21+5:302024-11-29T08:11:07+5:30
प्रशासकीय यंत्रणेविषयी काही तक्रारी असतील, मतदान यंत्रांविषयी काही सांगायचे असेल तर ते लेखी पाठवावे असे राज यांनी उमेदवारांना सांगितले.
पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी पुण्यात मनसेच्या पराभूत उमेदवारांची भेट घेतली व त्यांच्यात उमेद जागृत केली. ठाणे व मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ८२ उमेदवार, त्यांचे स्थानिक जिल्हाध्यक्ष व अन्य प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. काही तक्रारी असतील तर त्या लेखी द्याव्यात असे आवाहन राज ठाकरे यांनी उमेदवारांना केले.
माध्यमांबरोबर काहीही संवाद न साधता बैठकीनंतर ते लगेचच निघून गेले. राज यांनी सर्व उमेदवारांची विचारपूस केली. त्यांच्या मतदारसंघात काय झाले? मते कमी का मिळाली? काय करण्याची गरज आहे असे वाटते? स्थानिक पदाधिकारी काम करत होते का? तुमच्यासमोर काही अडचणी आहेत का? असे विविध प्रश्न विचारत त्यांनी उमेदवारांना बोलते केले. बहुसंख्य उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी मनसेने राज यांच्या सभा होण्याची गरज होती असे सांगितले. त्याचबरोबर ठाम भूमिका घेऊन निवडणूक लढवली हे पक्षासाठी चांगलेच झाले. मात्र, आता संघटन वाढवणे आवश्यक आहे असेही मत व्यक्त केले.
‘पुरावे जमा करत आहोत’
संपर्क नेते बाबू वागसकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रशासकीय यंत्रणेविषयी काही तक्रारी असतील, मतदान यंत्रांविषयी काही सांगायचे असेल तर ते लेखी पाठवावे असे राज यांनी उमेदवारांना सांगितले. आम्हीही पुरावे जमा करत आहोत. पुरेसे पुरावे जमा झाल्यानंतर राज यांना ते दाखवले जातील व पुढे त्यांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असे वागसकर यांनी सांगितले.