"सरकार कारवाई करेलच, पण विसरू नका की..."; मराठी पाट्यांवरून राज ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:05 PM2023-09-26T12:05:41+5:302023-09-26T12:11:22+5:30

२ महिन्यांत मराठी पाट्या लावण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश

Raj Thackeray gives warning to Non Marathi businessmen in Maharashtra after Marathi Sign board rule by Supreme Court of India | "सरकार कारवाई करेलच, पण विसरू नका की..."; मराठी पाट्यांवरून राज ठाकरेंचा इशारा

"सरकार कारवाई करेलच, पण विसरू नका की..."; मराठी पाट्यांवरून राज ठाकरेंचा इशारा

googlenewsNext

Raj Thackeray, Marathi Board: दुकानावर मराठी पाट्या लावण्याच्या सक्तीविरोधात व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सोमवारी या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने व्यापारांना फटकारत दुकानावर २ महिन्यांत मराठी भाषेत पाट्या लावा, असा आदेश दिला. मविआ काळात दुकानावरील मराठी पाट्या सक्तीच्या करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. मात्र सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला. काही अटींनुसार, प्रत्येक छोट्या, मोठ्या दुकानावर मराठी पाट्या असणे गरजेचे आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणाले. हा निर्णय येताच, मराठी पाट्यांच्या मुद्द्यांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपले रोखठोक मत मांडले आणि इशारा दिला.

राज ठाकरे ट्विटमध्ये म्हणाले, "सस्नेह जय महाराष्ट्र पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. 'मराठी पाट्या' ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली. मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे."

"असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. 'मराठी पाट्या' ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत," अशा इशारा राज यांनी ट्विटमधून दिला.

Web Title: Raj Thackeray gives warning to Non Marathi businessmen in Maharashtra after Marathi Sign board rule by Supreme Court of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.