मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंना मिळाली नवी माहिती; मनोज जरांगेंसोबत काय चर्चा झाली?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 12:38 PM2023-09-04T12:38:26+5:302023-09-04T12:41:24+5:30
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील ८६ तालुक्यात मराठा हे कुणबी असल्याचे पुरावे सापडले आहेत.
जालना – राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत जी काही माहिती त्यांच्याकडे होती ती सांगितली. सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे ते मिळू शकत नाही असं त्यांनी म्हटलं. तुम्हाला फक्त झुलवत ठेवतील. परंतु आमची मागणी सुप्रीम कोर्टातील आरक्षणाची नाही असं मी सांगितले. पूर्वी आम्हाला आरक्षण होतं, आता नाही हे आम्ही सांगितले. आम्ही आरक्षण कोणतं मागतोय हे सांगितल्यानंतर राज ठाकरे सकारात्मक झाले अशी माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
राज ठाकरेंसोबत काय चर्चा झाली त्याबाबत मनोज जरांगे सविस्तर म्हणाले की, मराठवाडा महाराष्ट्रात सामील होण्यापूर्वी आम्हाला आरक्षण होते. मराठवाड्यातील मराठा यांचा मूळ व्यवसाय शेती आहे. सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाशी आमचा काहीही संबंध नाही. सरकारने आज बैठक लावली. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील ८६ तालुक्यात मराठा हे कुणबी असल्याचे पुरावे सापडले आहेत. हे आम्ही राज ठाकरेंना सांगितले. सुप्रीम कोर्टातील आरक्षण आणि आम्ही मागतोय ते आरक्षण वेगळे आहे. मी तज्ज्ञांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी बोलतो असं राज ठाकरे म्हणाले. समितीच्या माध्यमातून सरकारकडे पुरावे आले आहेत. त्यामुळे सकल मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत कुणबी प्रमाणपत्रे देतील. राज ठाकरे १०० टक्के आपल्याला पाठिशी आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलं.
त्याचसोबत महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदेंकडे अपेक्षेने बघतोय, सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. ७० वर्षांपासून आम्हाला मराठा आरक्षणासाठी झुलवत ठेवले राज ठाकरेंचे म्हणणे सत्य आहे. तुम्ही स्वत:चा जीव धोक्यात घालू नका, हे गेंड्याच्या कातडीचे आहे असं राज ठाकरे म्हणाले. परंतु आमचा विषय समजून घेतल्यानंतर त्यांनी उपोषणावर भाष्य केले नाही. निजामकाळात आम्हाला आरक्षण होते, मराठवाड्यातील पुरावे सापडले आहेत. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र द्यावे अशी आमची मागणी आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश निघेल असा विश्वास वाटतो असंही जरांगे यांनी सांगितले.
दरम्यान, सुप्रीम कोर्टातील आरक्षण आणि हा विषय वेगळा आहे हे राज ठाकरेंना कळाल्यानंतर त्यांनी याबाबत तज्ज्ञांशी बोलतो. मला हा विषय माहिती नव्हते. ज्या आरक्षणाबाबत मी अभ्यास केलाय तो सुप्रीम कोर्टात आहे त्यामुळे मी होऊ शकत नाही म्हटलं. परंतु तुम्ही जो विषय मांडलाय, त्याबाबत माहिती घेतो. जर हे असेल तर आरक्षण मिळू शकते असं राज ठाकरेंनी म्हटलं. आम्ही जो विषय राज ठाकरेंना सांगितला तो त्यांना पटला आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
'मराठा आरक्षणाच्या मागणी'साठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या श्री. मनोज जरांगे-पाटील व सहकारी आंदोलकांशी मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी एकूणच मराठा आरक्षण आणि काल-परवाकडे झालेल्या लाठीहल्ल्याच्या अमानुष घटनेबाबत सविस्तर चर्चा केली. #मराठाआरक्षण… pic.twitter.com/JirYRf6z8S
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 4, 2023
राज ठाकरेंचा सरकारला इशारा
मी तुमच्यासमोर भाषण करायला नाही तर विनंती करायला आलोय. ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या उचलायला सांगितल्या, ज्यांनी गोळीबारी करायला सांगितली त्या सर्वांना आधी मराठवाडा बंदी करून टाका. केलेल्या गोष्टीची माफी मागत नाही तोवर कुणालाही पाऊल ठेवायला लावू नका. झालेल्या गोष्टीचे राजकारण करू नये असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, तुम्ही विरोधात असता तर काय केले असते? असा सवाल राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना विचारला.