लाव रे तो व्हिडीओ; राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर बोट ठेवले, कुंभमेळ्यावरही थेट बोलले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 20:57 IST2025-03-30T20:56:36+5:302025-03-30T20:57:18+5:30
'गंगा साफ करण्याची घोषणा करणारे पहिले व्यक्ती राजीव गांधी, आता नरेंद्र मोदी आले...'

लाव रे तो व्हिडीओ; राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर बोट ठेवले, कुंभमेळ्यावरही थेट बोलले...
Raj Thackeray Gudhi Padwa Melava : दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यातून त्यांनी महाकुंभ मेळावा आणि देशातील नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला. 'बाळा नांदगावकरांनी माझ्यासाटी पाणी आणले होते, मी त्यांना सांगितले, मी पिणार नाही. मग नव्याने वारे शिरलेल्या काहींना वाटले की, मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का? आज आपल्या देशातील नद्यांची भीषण अवस्था आहे. ज्या नद्यांना आपण माता म्हणतो, देवी म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचे अजिबात लक्ष नाही.'
गंगेचा प्रश्न राजीव गांधींनी पहिल्यांदा मांडला
राज ठाकरे पुढे म्हणतात, 'गंगा साफ करावी असे पहिल्यांदा बोलणारी व्यक्ती राजीव गांधी होती. ते पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदा गंगा साफ करण्याचे काम सुरू केले. तेव्हापासून आतापर्यंत हेच काम सुरू आहे. 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाले, तेही म्हणाले गंगा साफ करणार. आताही ते काम सुरू आहे. माझ्याकडे काही उत्तरेतील लोक येऊन गेले. त्यांनी सांगितले लाखो लोकांनी कुंभमेळ्यात आंघोळ केल्यानंतर आजारी पडले. पडणारच ना आजारी. त्या गंगेवरची परिस्थिती काय आहे...प्रश्न गंगेचा आणि कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाही, प्रश्न पाण्याचा आहे. आतापर्यंत 33 हजार कोटी गंगेवर खर्च झालेत.'
गंगा प्रदूषणाचा व्हिडिओ दाखवला
'एका महंताला मृत्यूनंतर तसेच गंगेत टाकले. घाटावर प्रेत जाळली जातात. अग्नि दिल्यासारखा करतात आणि प्रेत गंगेत टाकून देतात. हा कोणता धर्म? आपल्या देशातील निसर्गावर धर्म आडवा येत असेल, तर त्याचे काय करायचे? आपल्या गोष्टींवर आपण सुधारणा नको का करायला? काळ बदलला, लोकसंख्या वाढली. हजार वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती, आताची वेगळी आहे. याच विधीसाठी वेगळी जागा करता येत नाही का? ते सांगतात लोक ऐकत नाही, ऐकत कसे नाहीत? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजे. या नद्यांचे काही भाग इतके गलिच्छ आहेत, या नद्या आपणच धर्माच्या नावाखाली बरबाद करतो आहोत.' यावेळी राज ठाकरेंनी गंगा प्रदूषणाचा एक मिनिटांचा व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओत गंगेवर प्रेत जाळताना दिसत आहे.
धर्माच्या गोष्टी मला सांगू नये
'महाराष्ट्रातील नद्यांची परिस्थिती हीच आहे. देशभरातील 319 नदीपट्टे आणि महाराष्ट्रातील 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. यातील सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या उल्हास, पवना, तापी, निरा वैनगंगा, रंगवली, वर्धा कृष्णा, मिठी नदी, पाताळगंगा...या नद्यांमधील पात्र खूप खराब आहे. मुंबईत पाच नद्या होत्या, त्यातल्या चार मेल्या, म्हणजे मारल्या. सांडपाणी आणि झोपडपट्ट्यांमुळे नदी मारली. पाचवीही मिठी नदी मरायला आली.' मुंबईतील नद्यांची परिस्थितीही दाखवली. जे-जे नैसर्गित स्त्रोत आहेत, ते त्यांनी बंद करायचे आणि आम्ही त्यावर बोललो तर धर्म आडवा येणार. धर्माच्या गोष्टी मला ह्यांनी सांगूच नये,' असेही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले.