मोकळी मैदाने वाचवण्यासाठी राज ठाकरे सरसावले
By admin | Published: January 15, 2016 04:43 PM2016-01-15T16:43:01+5:302016-01-15T16:52:57+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मैदाने, बागांच्या मोकळ्या जागा खासगी विकासकांना देण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मैदाने, बागांच्या मोकळ्या जागा खासगी विकासकांना देण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला. या जागा खासगी बिल्डर्सचा द्यायचा सत्ताधा-यांचा डाव असल्याची टीकाही त्यांनी केली. या निर्णयाविरोधात मनसेतर्फे मुंबईत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा करत त्याला कोणताही राजकीय रंग न देता मुंबईतील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज यांनी केले. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मनसेच्या स्थापनेपासूनच आम्ही मुंबईतील मोकळ्या जागांवर असलेली आरक्षणे हटवण्यास विरोध दर्शवला आहे, त्यापासून आम्ही मागे हटणार नाही. या मोकळ्या जागा तसेच मैदाने, बागा म्हणजे शहराची फुफ्फुसे आहेत, असे ते म्हणाले. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने काल बहुमताच्या जोरावर शहरातील १२०० एकर जागा खासगी विकासकांना देण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला असला तरी आम्ही रस्त्यावर उतरून तो हाणून पाडू, असे राज म्हणाले. तसेच मुंबईतील रेसकोर्सवर केवळ घोडेच धावत नाहीत तर अनेक नागरिकही तिथे फिरायला येतात असे सांगत तिथेही कोणतेही बांधकाम केलं जाऊ नये असे ते म्हणाले.