बदलत्या भूमिकांचा राज ठाकरेंना फटका!

By admin | Published: February 1, 2017 02:21 AM2017-02-01T02:21:52+5:302017-02-01T02:21:52+5:30

‘विठ्ठलाला बडव्यांनी घेरलय’ असा आरोप करीत राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आज ‘विठ्ठल (शिवसेनाप्रमुख

Raj Thackeray hit the changing roles! | बदलत्या भूमिकांचा राज ठाकरेंना फटका!

बदलत्या भूमिकांचा राज ठाकरेंना फटका!

Next

- यदु जोशी,  मुंबई

‘विठ्ठलाला बडव्यांनी घेरलय’ असा आरोप करीत राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आज ‘विठ्ठल (शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे) हयात नाहीत. राज यांच्या भाषेतील बडव्यांच्या हातात शिवसेना असताना त्यांनी महापालिका निवडणुकीत युती करण्याची तयारी दाखविली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची दखलदेखील घेतली नाही. एकूणच गेल्या दोन दिवसांच्या संपूर्ण घटनाक्रमात मनसे आणि राज ठाकरे यांचे पूर्णत: हसे झाले.
मनसेच्या निर्मितीनंतर राज यांची मोठी हवा तयार केली.‘कृष्णकुंज’ हा त्यांचा शिवाजी पार्कजवळील बंगला सत्तेचे नवे केंद्र म्हणून समोर आला. मात्र,राज यांनी त्याच बंगल्यात बसून जो भूमिकांचा ‘यूटर्नकुंज’केला त्यामुळे त्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले, असे त्यांचे जवळचे लोकही सांगतात.
विधानसभा निवडणुकीत १३ आमदार २००९ मध्ये निवडून आणले. मुंबई, पुणे आणि नाशिक महापालिकेत चांगले यश मिळविले. नाशिकमध्ये तर सत्ता आणली. हा सगळा ‘राज करिष्मा’ होता. बाळासाहेबांसारखी वक्तृत्व शैली असलेल्या या युवा नेत्याने स्वत:विषयी प्रचंड अपेक्षा निर्माण केल्या. त्यांनी शिवसेना सोडली तरी भाषणाची खास शैली, एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार असणे यामुळे ठाकरे ब्रँड त्यांच्याकडेही होताच.
भूमिकांच्या यूटर्नबरोबरच पक्ष चालविण्यासाठीच्या मेहनतीची कमतरता हेही ऱ्हासाचे एक कारण ठरले. ‘पक्ष चालवायचा तर सकाळी सातला उठावे लागते’ असा टोमणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज यांचे नेतृत्व भरात असताना मारला होता. राज यांनी आपल्या भाषणांनी प्रभाव तर निर्माण केला पण तो कायम ठेवण्यासाठीची यंत्रणा/ कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्यात ते अपेशी ठरले. राजकीय भूमिका राज यांनीच बदलल्या असे नाही भाजपा, काँग्रेस अन् अगदी शिवसेनेनेदेखील त्या अनेकदा बदलल्या पण बदलेलेल्या भूमिकांवर लोकांचे समाधान करणारी यंत्रणा त्या पक्षांकडे होती.
राज यांच्याकडे त्याचा अभाव आजही आहे. धरसोड भूमिकेमुळे नाशिकमध्ये केलेली चांगली कामे, मुंबई, पुण्यातील बऱ्याच मनसे नगरसेवकांची चांगली कामगिरी झाकोळली गेली. राज यांच्या नेतृत्वात राजकीय भवितव्य असुरक्षित वाटू लागल्याने अनेकांनी त्यांची साथ सोडली. मुंबईत शिवसेनेविरुद्ध अनेक विषय उचलण्यासारखे असतानाही त्यांच्यापुढे मैत्रीचा हात करून मनसेने धक्का दिला.
दोन्ही भावांनी एकत्र यावे अशी प्रामाणिक इच्छा बाळगून अनेकदा त्यासाठी प्रयत्न करणारे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची हतबलता ही मनसेैनिकांची प्रातिनिधीक हतबलता आहे. राज यांनी उद्धव ठाकरे यांना युतीसाठी फोन केले.
एवढेच नव्हे तर, ‘अरे! मनसेचे अस्त्वित्व अजूनही आहे का’, अशी कुत्सित विचारणारा चॅनेलवरील मुलाखतीत करणारे खा.संजय राऊत यांनाही राज यांनी फोन केले. तरीही शिवसेनेकडून कोणीही मनसेला भीक घातली नाही. पक्षाची दयनीयता या निमित्ताने समोर आली असून वारंवारच्या ‘यूटर्नकुंज’ऐवजी ‘चिंतनकुंज’ तत्काळ होणे आवश्यक असल्याची मनसेतील नेत्यांची भावना आहे.

- ‘मला काही सांगायचय’ असे आवाहन करीत राज्यभरातील मनसैनिकांना गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत बोलावले. लोक मोठ्या संख्येने आलेदेखील.
- राज यांनी स्वत: निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आणि आठ दिवसांतच यू टर्न घेत लढण्याचा निर्धार गुंडाळला.
- लोकसभा निवडणुकीत पुणे आणि नाशिक सोडून भाजपाच्या विरोधात उमेदवारच दिले नाहीत. या अनाकलनीय भूमिकेने राज यांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह लागले.
- छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला राज यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांना मानणाऱ्या मतदारांमध्ये नाराजी पसरली, असे राजकीय जाणकारांना वाटते.

Web Title: Raj Thackeray hit the changing roles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.