Raj Thackeray Interview: तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही; 'दादू' उद्धव ठाकरेंबद्दल राज ठाकरे थेटच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 08:15 PM2022-07-23T20:15:11+5:302022-07-23T20:15:54+5:30
Raj Thackeray on Uddhav Thackeray's trust: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
शिवसेनेत उद्धव ठाकरेंविरोधात बंड करणाऱ्या शिंदे गटावर जर वेळ आलीच तर मी त्यांना मनसेत विलिन करण्यावर विचार करेन, असे वक्तव्य करून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
Raj Thackeray Interview: शिवसेना फुटण्याचं फुकट श्रेय भाजपाने घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचे - राज ठाकरे
मी शिवसेनेत बंड केले नाही. मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. मी कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, यामुळे माझी तुलना बंडखोरांशी करू नये, असे राज ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार हे माझे जुने सहकारी आहेत. मी माध्यमांतून त्यांचा गट मनसेत विलिन होईल असे ऐकले. या तांत्रिक बाबी आहेत. जर शिंदेंना गरज पडली तर आणि त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर मी त्या ४० आमदारांना मनसेत विलिन करण्याबाबत विचार करेन, असे राज ठाकरे म्हणाले. झी २४ तासने राज यांनी ब्लॅक अँड व्हाईट मुलाखत घेतली.
यावेळी भाजपासोबत युती करणार का? असा सवाल राज ठाकरेंना विचारण्यात आला. यावेळी राज ठाकरेंनी जर तर मध्ये जाण्यात अर्थ नाही. मी तो विचार करत नाहीय. युतीचा विचार करून पक्ष बांधायला घेतला तर बांधला जाणार नाही. या आयत्यावेळी येणाऱ्या गोष्टी आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. मी भाजपाची स्तुती केली की त्यांच्यासोबत, शरद पवारांशी बोललो की युती करतात की काय अशा चर्चा केल्या जातात, असे राज ठाकरे म्हणाले.
यानंतर उद्धव ठाकरेंना २०१४ मध्ये युतीसाठी दोनदा टाळी दिल्याच्या गोष्टींवर राज ठाकरेंना विचारले असता धक्कादायक वक्तव्य राज ठाकरेंनी केले. तो माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे. विश्वास ठेवण्यासारखा नाही. बाकीच्या लोकांचे वाईट वाटते. अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहीत नाही, तेवढा मला माहीत आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबाबत आपले मत व्यक्त केले. बाळासाहेबांनी फोन केला, दादू इस्पितळात आहे यावर छे़डले असता राज यांनी तो भावनेचा विषय होता, आजारपणाचा होता, असे स्पष्ट केले.