Raj Thackeray Interview: गरज पडली तर शिंदे गट मनसेत विलिन करण्यावर विचार करेन; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच दिले स्पष्ट संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 07:52 PM2022-07-23T19:52:13+5:302022-07-23T19:52:45+5:30
Raj Thackeray Talk on Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचा ४० शिवसेना आमदारांचा गट मनसेत विलीन होणार असल्याच्या शक्यतांवर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेना पक्ष फुटला तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंमुळेच असा घणाघाती आरोप करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकणारे वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे यांचा ४० शिवसेना आमदारांचा गट मनसेत विलीन होणार असल्याच्या शक्यतांवर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Raj Thackeray Interview: शिवसेना फुटण्याचं फुकट श्रेय भाजपाने घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचे - राज ठाकरे
मी शिवसेनेत बंड केले नाही. मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. मी कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, यामुळे माझी तुलना बंडखोरांशी करू नये, असे राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर शिंदे गट मनसेत विलीन होणार असल्याच्या वृत्तांवर राज ठाकरेंनी का नाही, अशा शब्दांत आपली भूमिका मांडली.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार हे माझे जुने सहकारी आहेत. मी माध्यमांतून त्यांचा गट मनसेत विलिन होईल असे ऐकले. या तांत्रिक बाबी आहेत. जर शिंदेंना गरज पडली तर आणि त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर मी त्या ४० आमदारांना मनसेत विलिन करण्याबाबत विचार करेन, असे राज ठाकरे म्हणाले.
तर त्याचा ऱ्हास सुरु होतो...
बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा सामना सुरु केला होता, तेव्हा त्याचा खप साडेतीन चार लाख एवढा होता. आता तो काही लोकांकडेच जातो. तेव्हा त्याचा प्रचंड खप होता. आज मार्मिक किती लोक वाचतात? कोणीच नाही, कारण त्यात बाळासाहेब नाहीत. तशीच अवस्था या शिवसेनेची झाली आहे. नशिबाला जर कोणी यश म्हणत असेल तर त्याचा ऱ्हास सुरु होतो, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेवर टीका केली. झी २४ तासने राज यांची ब्लॅक अँड व्हाईट मुलाखत घेतली.