राज ठाकरे म्हणजे 'कटी पतंग', भाजपाचा बोचरा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 10:12 PM2019-01-15T22:12:18+5:302019-01-15T22:15:52+5:30
राज ठाकरे यांनी आज मकर संक्रांतीचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली होती. आता भाजपानेही त्यांना प्रतिव्यंगचित्राच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
मुंबई - राज ठाकरे यांनी आज मकर संक्रांतीचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली होती. पंतप्रधान मोदी थापांचे पतंग उडवत असल्याचे व्यंगचित्र राज यांनी रेखाटले होते. आता भाजपानेही त्याला प्रतिव्यंगचित्राच्या माध्यमातून टोला लगावला आहे. राज ठाकरे म्हणजे एक कटी पतंग आहे, असा बोचरा टोला भाजपाने लगावला आहे.
राज ठाकरेंकडे असलेले सगळे मुद्दे वापरून संपले आहेत. तरीही बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच आहे, असे भाजपाने प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात म्हटले आहे. राज ठाकरे 'राज: एक कटी पतंग' असा उल्लेख असलेला पतंग उडवत आहेत आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांचे तुटलेले पतंग खाली पडले आहेत. तसेच शरद पवार आणि काही नमोरुग्ण त्यांना प्रोत्साहन देत आहेत, असे या व्यंगचित्रात दाखवले आहे.
राज: एक ‘कटी पतंग’ ... @ANI@PTI_Newspic.twitter.com/MafbKmcAmJ
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 15, 2019
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून लक्ष्य केले होते. पंतप्रधान मोदी थापांचे पतंग उडवत असल्याचं व्यंगचित्र राज यांनी रेखाटले होते. अमित शहा, भक्त आणि काही मीडियासोबत मोदी पतंग उडवत आहेत. 10 टक्के सवर्ण आरक्षणाचा पतंग आकाशात उडत आहे आणि आधी दिलेल्या आश्वासनांचे पतंग गच्चीत पडले आहेत, असं व्यंगचित्र काढून राज यांनी आरक्षणाच्या निर्णयावरुन टोला लगावला होता.