Raj Thackeray Letter on Loud Speaker: लाऊडस्पीकरचा आवाज नेमका किती असावा? राज ठाकरेंनी 'सर्वोच्च' डेसिबल सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 08:52 PM2022-05-03T20:52:04+5:302022-05-03T20:52:49+5:30
Raj Thackeray on Loud Speaker decibels limit: ध्वनिक्षेपक किती क्षमतेने लावावा त्याबाबतच्या मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आहेत. ही मर्यादा किती आहे, ते राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच तीन प्रकारे तक्रारी करण्यास सांगितले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली अंतिम भूमिका जाहीर केली. आजपर्यंत राज्य सरकारला मशीदींवरील भोंगे उतरविण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता. उद्यापासून राज्यभरात मशीदींसमोर हनुमान चालिसा लावणार असे सांगत राज ठाकरे आताही ठाम राहिले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ध्वनिक्षेपकाची मर्यादा किती असावी याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मर्यादाच सांगितली आहे.
औरंगाबाद पोलिसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल केल्यानंतर राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करतील असे सांगितले जात होते. अखेर राज ठाकरेंचे पत्र आले असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब ठाकरेंचे ऐकणार की शरद पवारांचे असा सवाल विचारत कोंडीत टाकले आहे. याचबरोबर तीन गोष्टी करण्याचे आदेश, आवाहन त्यांनी केले आहे.
देशात इतकी कारागृहं नाहीत की...; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा; भोंग्याचा वाद तापणार
या देशातल्या राज्य सरकारांतला प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देतोय. या भोंग्यांचा जनतेला त्रास होत आहे. भोंग्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की “रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु ३६५ दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल.", असे राज ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे.
ध्वनिक्षेपक किती क्षमतेने लावावा त्याबाबतच्या मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आहेत. या मर्यादा मी तुम्हाला मुद्दामहून सांगत आहे- लोकवस्ती असेल त्या भागात कमीतकमी १० डेसिबल आणि जास्तीतजास्त ४५ ते ५५ डेसिबल आवाजात ध्वनिक्षेपक लावता येतो. लक्षात घ्या, १० डेसिबल म्हणजे आपण कुजबुज करतो तो आवाज आणि ५५ डेसिबल म्हणजे आपल्या घरातल्या मिक्सरचा आवाज, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.