"राज ठाकरे मास लीडर, ही नव्या पर्वाची सुरुवात...", महायुतीला काय फायदा होणार? शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 09:57 AM2024-03-19T09:57:17+5:302024-03-19T09:57:59+5:30
"यामुळे राज ठाकरे आज दिल्लीला गेले याचा आनंद मलाही आहे. मी पूर्वीही बोललो होतो, की राज ठाकरे आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. मला वाटते ही नवीन पर्वाची सुरुवात आहे. महत्वाचे म्हणजे आमची विचारधारा एक आहे."
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दिल्लीत आहेत. त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आता राज्यातील महायुतीचा भाग होण्याची शक्यता आहे. यामुळे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच महायुतीला आता आणखी एक नवा मित्रपक्ष मिळू शकतो. राज ठाकरे यांच्या महायुतीतील सहभागावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा माध्यमांत सुरू आहे. यासंदर्भात आता, "मला वाटते ही नवीन पर्वाची सुरुवात आहे. महत्वाचे म्हणजे आमची विचारधारा एक आहे. राज साहेब मास लिडर आहेत. म्हणून याचा महायुतीला फायदाच होईल," असे शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते तथा आमदार संयज शिरसाट यांनी म्हटले आहे. ते एका वृत्त वाहीनीसोबत बोलत होते.
ही नवीन पर्वाची सुरुवात -
शिरसाट म्हणाले, "आजच्या राजकारणात एकटा लढू शकत नाही, असी परिस्थिती आहे. यामुळे तुम्ही पाहिलं तर कुठलाही पक्ष असेल, तो इतरांना बरोबर घेऊन आपली लढाई लढण्याच्या मनःस्थितीत आहे. यामुळे राज ठाकरेही गेल्या अनेक वर्षांपासून एकटे लढत आहेत. मात्र आऊटपूट मिळत नाही. जर इतरांबरोबर गेले तर आऊटपूट मिळेल हे निश्चित आहे. यामुळे राज ठाकरे आज दिल्लीला गेले याचा आनंद मलाही आहे. मी पूर्वीही बोललो होतो, की राज ठाकरे आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. मला वाटते ही नवीन पर्वाची सुरुवात आहे. महत्वाचे म्हणजे आमची विचारधारा एक आहे."
उद्धव ठाकरेंवर निशाणा -
"तुम्ही कालची सभा बघितली ना, ती I.N.D.I.A. की कोणती आघाडी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची, विचारधारा एक नाहीयेत. म्हणून भाषण करू शकले नाही. बोलू शकले नाही. जे मनात आहे ते मांडू शकले नाही. आता उबाठा गटाचे लोक म्हणणार आहेत का, 'गर्व से कहो हम हिंदू है'? ते 'जय भवानी जय शिवाजी' घोषणा देणार आहेत का? नाही दिल्या, नाही करू शकत. त्यामुळे युती होताना तुमची विचारधाराही एक असायला हवी," असा निशाणाही शिरसाट यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर साधला.
शिरसाट पुढे म्हणाले, "आज राज ठाकरे यांनी जे पाऊल उचलले आहे, ते महत्वाचे आहे. मला वाटते याचा परिणाम महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे बोलले आहेत, की आम्ही 45 क्रॉस करणार आहोत, त्याच्यासाठी हे सपोर्टिंग आहे. फार मोठा सपोर्ट मिळेल. राज साहेब मास लिडर आहेत. म्हणून याचा महायुतीला फायदाच होईल."