Badlapur Case: पीडितेच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राज ठाकरेंनी सरकारवर ओढले ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 07:47 PM2024-08-28T19:47:17+5:302024-08-28T19:47:54+5:30

Raj Thackeray Badlapur Sexual Abuse Case: बदलापूर येथील शाळेत लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबीयांची राज ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरेंनी पोलीस आणि सरकारवर ताशेरे ओढले.

Raj Thackeray Met the victim's family of Badlapur sexaul abuse Case and criticized mahayuti government | Badlapur Case: पीडितेच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राज ठाकरेंनी सरकारवर ओढले ताशेरे

Badlapur Case: पीडितेच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राज ठाकरेंनी सरकारवर ओढले ताशेरे

Raj Thackeray Latest News:बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. दरम्यान, पीडित मुलींच्या कुटुंबीयांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी महायुती सरकारला खडेबोल सुनावले आहेत. 

राज ठाकरे यांनी पीडित मुलींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी पोलीस आणि राजकीय हस्तक्षेप या दोन मुद्द्यांवर भाष्य केले आहे. 

राज ठाकरेंनी बदलापूर घटनेबद्दल काय म्हटले?

"बदलापूरची दुर्दैवी घटना, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी संगीता चेंदवणकर आणि महिला सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी ही घटनाउघडकीस आणली, त्या दुर्दैवी पालकांच्या कुटुंबियांना आधार दिला", असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. 

या सगळ्या प्रकाराबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणतात, "या घटनेच्या आसपास मी नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान विदर्भात होतो. यामुळे महाराष्ट्र सैनिकांशी आणि इतरांशी फोनवर संवाद साधला. आज मात्र बदलापूरला जाऊन, तिथल्या महाराष्ट्र सैनिकांशी, तिथल्या स्थानिकांची जाऊन भेट घेतली." 

राज ठाकरेंकडून लोकांच्या आंदोलनाचे समर्थन

"बदलापूरची घटना, त्यावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याने ( पोलीस अधिकारी महिला असून देखील त्यांना त्या मुलींची व्यथा समजू नये?) दाखवलेला हलगर्जीपणा, बेफिकिरी इतकी टोकाची होती की लोकांचा राग अनावर होणं, त्यातून निदर्शनं होणं हे स्वाभाविकच होतं", असे सांगत राज ठाकरेंनी आंदोलकांचे समर्थन केले.  

राज ठाकरेंनी पुढे म्हटले आहे की, "अशा उद्रेकानंतर परिस्थिती ही नरमाईने हाताळायची असते. पण इथे आंदोलकांवर गुन्हे दाखल केले गेलेत. लोकांच्या मागे ससेमिरा लावला गेला आहे. हे चूक आहे. असं होता कामा नये. त्यामुळे मी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून, आंदोलकांना त्रास न देण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरला." 

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात राजकीय हस्तक्षेप

"मी नेहमी म्हणतो तसं की महाराष्ट्रातील पोलिसांवर इतका ताण असताना पण ते ज्या पद्धतीने राज्य हाताळतात ते वाखणण्याजोगं आहे. पण शेवटी पोलिसांवर पण कुठून कुठून येणारा ताण, राजकीय हस्तक्षेप याचा त्यांना कायम त्रास असतो. तस इथेही राजकीय हस्तक्षेप आहे असं मला जाणवतंय, याबद्दल मी सरकारशी बोलणार आहे", असा गंभीर मुद्दा राज ठाकरेंनी मांडला आहे. 

याच मुद्द्यावर राज ठाकरेंनी भाष्य करताना म्हटले आहे की, "सामान्यांना वेठीस धरण्याच्या ऐवजी, राज्यातील स्त्रिया सुरक्षित राहतील हे पाहिलं तर अशा प्रकारची निदर्शनंच होणार नाहीत. त्यामुळे सरकारने आपलं प्रथम कर्तव्य या घटना होऊ न देणे, गुन्हेगारांना शासन करणे हे विसरू नये."  

  

"आणि मागे मी म्हणलं तसं महाराष्ट्र सैनिकांनी या घटनेत जशी सतर्कता दाखवली तशी यापुढे पण कायम दाखवावी. आणि गरज पडली तर अशा घाणेरड्या प्रवृत्तींना हात सोडून कसा धडा शिकवायचा हे तुम्हाला माहीतच आहे", असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Web Title: Raj Thackeray Met the victim's family of Badlapur sexaul abuse Case and criticized mahayuti government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.