Raj Thackeray: राज ठाकरे २९ तारखेलाच मुंबई सोडणार; औरंगाबाद दौऱ्याआधी दोन दिवस कुठे जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 03:17 PM2022-04-26T15:17:48+5:302022-04-26T15:18:36+5:30
Raj Thackeray MNs Aurangabad Rally Update: मनसेने सभेसाठी परवानगी मागितली असताना पोलिसांनी औरंगाबादमध्ये १३ दिवस जमावबंदीचे आदेश लागू केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
मशीदींवरील भोंग्यांविरोधात उघड भूमिका मांडणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावर टांगती तलवार आहे. मनसेने सभेसाठी परवानगी मागितली असताना पोलिसांनी औरंगाबादमध्ये १३ दिवस जमावबंदीचे आदेश लागू केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. अशातच पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा, असे मनसैनिकांना आदेश देणारे राज ठाकरे हे २९ तारखेलाच मुंबई सोडणार आहेत.
औरंगाबादमध्ये १ मे रोजी राज ठाकरेंची सभा आहे. या सभेला पाच दिवस शिल्लक असताना सभेच्या दोन दिवस आधीच राज ठाकरे कुठे जाणार याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे. राज ठाकरे २९ आणि ३० एप्रिलला पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. तिथे ते कार्यकर्त्यांसोबत बैठका, मनपा निवडणुकीची मोर्चेबांधणी करतील. यानंतर ३० एप्रिलला सायंकाळी ते औरंगाबादकडे रवाना होतील.
मनसेचे मुंबई, पुण्यातील कार्यकर्ते, नेते देखील राज यांच्यासोबत औरंगाबादकडे निघणार आहेत. औरंगाबाद पोलिसांनी काढलेल्या जमावबंदीच्या आदेशानुसार, 26 एप्रिल ते 9 मे या काळात औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू असणार आहे. या आदेशानुसार, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी असेल. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली. पण, आता या आदेशामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणारी सभा रद्द करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
चला संभाजीनगर pic.twitter.com/AE06KuFwb7
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 26, 2022
दरम्यान, सभेला परवानगी मिळाली नसली तरीदेखील राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा असे आदेश ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे.