Raj Thackeray: मनसे कार्यकर्ते जमायला सुरुवात! राज ठाकरे थोड्याच वेळात भूमिका मांडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 06:52 PM2022-05-03T18:52:03+5:302022-05-03T19:11:11+5:30
Raj Thackeray Latest News: सायंकाळपर्यंत पोलीस राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थवर नोटीस घेऊन पोहचण्याची शक्यता आहे. या कारवाईआधी गृहमंत्री वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात तासभर बैठक झाली होती.
औरंगाबादमधील सभेवरून राज्यातील वातावरण ईदच्या संध्येला तापू लागले आहे. औरंगाबाद पोलिसांनीराज ठाकरेंवर गुन्हा दाखल केला आहे. १२ अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर मनसेचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पोलीस फौजफाटादेखील वाढला आहे.
औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला १६ अटी घालून परवानगी दिल्या होत्या. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११६, ११७, १५३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत पोलीस राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थवर नोटीस घेऊन पोहचण्याची शक्यता आहे. या कारवाईआधी गृहमंत्री वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात तासभर बैठक झाली होती.
या साऱ्या घडामोडींवर राज ठाकरे कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडणार आहेत. ही भूमिका ते ट्विटरवरून मांडण्याची शक्यता आहे. तर काही वेळापूर्वी राज ठाकरे त्यांच्या घराच्या गॅलरीमध्ये आले होते. यावेळी ते अस्वस्थ असल्याचे दिसले. काही सेकंद गॅलरीतून बाहेरील रस्त्यावर डोकावले आणि आतमध्ये गेले.
एबीपी माझाच्या वृत्तानूसार, राज ठाकरे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे जामीनपात्र गुन्हे आहेत. राज ठाकरे यांच्याविरोधात भादंवि १५३ नुसार गुन्हा दाखल असला तरी हिंसाचाराची घटना न घडल्याने त्यांना १५३ ए हे कलम लावण्यात आले नाही. या कलमानुसार दाखल होणारा गुन्हा अजामीनपात्र आहे. यामुळे उद्याच्या मशीदींवरील भोंग्यांच्या अल्टीमेटमवर राज ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्या महाराष्ट्राच लक्ष लागले आहे.