राज ठाकरे नरमले, 'रिक्षा जाळा' आंदोलन स्थगित करण्याची सूचना
By admin | Published: March 11, 2016 04:07 PM2016-03-11T16:07:44+5:302016-03-11T16:08:01+5:30
दोन दिवसांपूर्वी'नव्या रिक्षा जाळण्याचा' आदेश देणारे राज ठाकरे नरमले असून त्यांनी हे आंदोलन स्थगित करण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - मनसेच्या १० व्या वर्धापनदिनी 'नव्या रिक्षा जाळण्याचा' आदेश देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे २ दिवसांतच नरमले असून हे आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर करत पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही हिंसक कृती न करण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १० व्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज यांनी मुंबईतील रस्त्यावर नवीन रिक्षा दिसल्यास रिक्षा चालकास आणि प्रवाशाला बाहेर काढून ती रिक्षा जाळण्याचे आदेश दिले होते. एका उदयोगपतीला कोट्यावधींचा नफा मिळवून देण्यासाठी ७० हजार रिक्षांचे परवाने देण्याचे काम राज्य शासनाकडून सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
राज यांच्या आदेशानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले, अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. गुरूवारी रात्री अंधेरी आरटीओ बाहेर आज्ञातांनी एक रिक्षा जाळली. मनसेच्या कार्यकर्त्यांनीच हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त होत होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर ऑटो मेन्स रिक्षा युनिअनचे अध्यक्ष शशांक राव यांनी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हे सर्व प्रकरण चिघळणार अशी चिन्हे दिसत असतानाच आज दुपारी राज यांनी नरमाईची भूमिका घेत कार्यकर्त्यांना रिक्षा परमिट आंदोलन स्थगित करण्याचा व पुढील सूचना मिळेपर्यंत आंदोलन न करण्याचा आदेश दिला.