Raj Thackeray on Ayodhya Visit: "रामाने बोलवलं की जाणार"; रखडलेल्या अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरेंचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 01:04 PM2022-09-19T13:04:52+5:302022-09-19T13:05:36+5:30
राज यांचा अयोध्या दौरा शस्त्रक्रियेमुळे स्थगित करण्यात आला होता
Raj Thackeray on Ayodhya Visit: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी होणारा अयोध्या प्रकृतीच्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता. स्वतः राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन याची घोषणा केली होती. प्रकृती अस्वस्थामुळे दौरा काही काळासाठी स्थगित केल्याची माहिती त्यांनी सांगितल्यानंतर, काही दिवसांतच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा घराबाहेर पडून राजकीय वर्तुळात सक्रिय झाले आहेत. राज ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर असून तेथे त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज यांनी अनेक प्रश्नांना रोखठोक आणि तितकीच दिलखुलास उत्तरे दिली. साहजिकच या प्रश्नांमध्ये अयोध्या दौऱ्याचा प्रश्न त्यांनी विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिले.
राजसाहेबांचा विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. नागपूरमध्ये महाराष्ट्र सैनिकांनी साहेबांचं आणि पक्षातील नेत्यांचं भव्य स्वागत केलं. त्यानंतर लगेचच नागपूरमधील पदाधिकाऱ्यांसोबत राजसाहेबांनी बैठक घेतली, ज्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. ह्या स्वागताची आणि बैठकीची क्षणचित्रं. pic.twitter.com/xfQr6bBYMG
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 18, 2022
राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यासोबतच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही गेल्या काही महिन्यांमध्ये आक्रमक भूमिका मांडली. मशिदींवरील भोंग्यांचा आसपास राहणाऱ्या लोकांना होणारा त्रास पाहता तशी भूमिका घेतल्याचे राज यांनी स्पष्ट केले होते. तसेच या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी, भोंगा वाजला की तेथे हनुमान चालिसा म्हणणार असेही राज ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार आंदोलनाला सुरूवात झाल्यावर अनेक ठिकाणी भोंगे बंद झाले. याच हिंदुत्वाच्या मुद्द्यासंदर्भात राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाऊन प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे दर्शन घेणार होते. उपस्थित पत्रकारांकडून राज ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित अयोध्या दौऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यांचा अयोध्या दौरा कधी होणार, असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे स्मितहास्य करत म्हणाले, "रामाने बोलवलं की जाणार."
शासकीय विद्यावेतन मिळत नाही म्हणून नागपूरच्या श्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली. ह्याप्रश्नी विदयार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तत्पर असेल. #विदर्भ_दौरा#मनसेpic.twitter.com/7PXmSRvUe8
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 18, 2022
राज यांनी ज्यावेळी अयोध्या दौऱ्याबाबतची घोषणा केली होती, त्यावेळी भाजपाचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण यांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने उत्तर भारतीयांविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांनी आधी उत्तर भारतीय मजूर वर्गाची माफी मागावी, त्यानंतर अयोध्येत त्यांना येऊ देऊ, असे बृजभूषण म्हणाले होते. या साऱ्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, राज ठाकरे यांचे पाठीचे दुखणे बळावले आणि त्यांना शस्त्रक्रिया करून घेण्यास सांगितले गेले. त्यानुसार मग राज यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याची सोशल मीडियावरून घोषणा केली होती. त्यामुळे आता राज यांचा अयोध्या दौरा महापालिका निवडणुकांच्या आधी होणार की नंतर? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.